नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील गत सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह रविवारी (दि़२६) दुपारी चिखलपाडा येथील एका विहिरीत आढळून आला़ विष्णू काशीनाथ चौधरी (२५, रा. तोरंगण ) असे या युवकाचे नाव असून, प्रेमप्रकरणावरून त्याचा खून केल्याचा आरोप तोरंगणवासीयांनी केला आहे़ दरम्यान, या घटनेमुळे चिखलपाडा व तोरंगण या गावांमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे़ हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू चौधरी याचे चिखलपाडा येथील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते़ मात्र ही बाब दोन्ही कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्यात वाद झाले होते़ तर संबंधित युवतीने हरसूल पोलीस ठाण्यात विष्णू चौधरीने आपणास व कुटुंबीयास मारहाण केल्याची तक्रार केली होती. यानंतर २१ मार्चला विष्णू हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चिखलपाड्याला गेला होता़ मात्र, यानंतर तो बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली होती़चौधरीच्या नातेवाइकांच्या त्याची चिखलपाडा येथेही चौकशी केली, मात्र त्याचा शोध लागला नाही़ रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चिखलपाडा येथील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती हरसूल पोलिसांना मिळाली़ त्यांनी घटनास्थळी जाऊन कपडे व इतर साहित्यांवरून ओळख पटविली असता तो बेपत्ता विष्णू चौधरी असल्याचे समोर आले़
तोरंगणच्या युवकाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ
By admin | Updated: March 26, 2017 22:40 IST