नाशिक : ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा तेलंगणा राज्यात ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे निश्चित झाले आहे. राज्य संघटनेच्या निवड चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील १ जानेवारी २००२ नंतर जन्म झालेल्या ५ खेळाडूंना बालेवाडी पुणे येथे १३ ते १९ ऑक्टोबर दरम्यान पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन ८ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. ज्या पाच खेळाडूंची निवड होईल, त्यांना पुढील निवडीसाठी
पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंना निवड चाचणीत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी लसीकरण केल्याची प्रत सोबत घेऊन ८ ऑक्टोबरला के. एन. केला हायस्कूल मैदानावर दुपारी ३.३० वाजता जन्म दाखला, हॉकी इंडिया रजिस्ट्रेशन, कॉलेज बोनाफाईड, आधार कार्ड घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी हॉकी खेळाडू नाशिक संघटनेत रजिस्टर नसतील त्यांनी त्यांची नावे संघटनेत नोंदणी करून घ्यावी. नाशिकमधील निवड चाचणी साई कोच रवींद्र दुपारे, सुकदेव काळे, सचिव अजीज सय्यद, आशिष देवकर घेणार आहेत. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना या निवड प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.