सुदीप गुजराथी, नाशिकदेशाच्या निरनिराळ्या भागांतील साधू-महंतांच्या जीवनशैलीबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असते; मात्र त्यांच्या जीवनशैलीविषयी सखोल अभ्यास करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मात्र कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झालेल्या साधूंची दिनचर्या, जीवनशैली याविषयी शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला असून, या अभ्यासातून काही निष्कर्षही काढले जाणार आहेत. त्यांतून मानवी आरोग्याविषयीचे काही नवे पैलू समोर येण्याची शक्यता आहे. डॉ. पवार महाविद्यालयाचे एमबीबीएसचे सुमारे साठ विद्यार्थी सध्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम पिंजून काढत असून, ते शक्य तितक्या साधूंशी बोलून त्यांच्याकडून विशिष्ट फॉर्म्स भरून घेत आहेत. त्यात त्यांचा आहार-विहार, व्यसनाधीनता, स्नानसंध्या, पूजाअर्चा, योगसाधना, ध्यानधारणा अशा अनेक तपशिलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी खास विदेशी तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. कुंभमेळ्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचा दावा महाविद्यालयाकडून करण्यात आला आहे. साधूंची जीवनशैली सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असून, त्यातील चांगल्या-वाईट गोष्टींचा सखोल अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. रोज सुमारे ६० ते ७० साधू या हिशेबाने दीड महिन्यात दोन ते अडीच हजार साधूंशी संपर्क साधून त्यांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयाने त्या-त्या आखाड्याची परवानगीही घेतली आहे. जमा होणाऱ्या या माहितीचे कुंभमेळा संपल्यानंतर पुढील दोन महिने शास्त्रशुद्ध विश्लेषण केले जाणार असून, त्यातून काही आरोग्यविषयक निष्कर्ष काढले जाणार आहेत. त्यावर आधारित संशोधन प्रकल्प वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्धीसाठी पाठवला जाणार आहे. याशिवाय पुढील कुंभमेळ्यांमध्येही या संशोधनाचा उपयोग होणार आहे. दरम्यान, या माहिती संकलनाबरोबर साधूंची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचारही केला जात आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही या चमूसोबत आहे.
साधूंचे नाव-गाव-पत्ता, शारीरिक बारकावे-त्यात त्वचा, फुफ्फुसांची स्थिती या माहितीसह त्यांची दिनचर्या, ध्यानधारणा, भोजनातील पदार्थ, आजार आदि बाबींची सखोल माहिती नोंदवून घेत आहोत. या अभ्यासातून आकाराला येणारा संशोधन प्रकल्प मानवी आरोग्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. हा प्रकल्प शासनाच्या आरोग्य विभागाकडेही पाठवला जाणार आहे. - डॉ. प्रदीप बर्डे, प्रकल्पप्रमुख