लासलगाव : येथील लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानच्या दीपावली उपक्रमांतर्गत सुरूची मिठाईची विक्री झाली असून, यावर्षी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे ६३ हजार किलो फराळाच्या पदार्थांची विक्री झाल्याचे संयोजक नानासाहेब पाटील यांनी सांगितले. यंदा डाळ, तांदूळ, तेल, बेसन यांचे भाव गगनाला भिडलेले असताना सामान्यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी सामाजिक जाणिवेतून अनेक घटकांनी या उपक्रमास मदत केल्याचे पाटील यांनी सांगितले. २५ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या दरम्यान सुमारे एक आठवडाभरात या फराळ पदार्थाची विक्री करताना विद्यार्थ्यांनी माल देण्यासाठी मोठी मेहनत घेतली. इतक्या मोठ्या प्रमाणावर फराळ पदार्थांची देवाण-घेवाण करणे हे अत्यंत अवघड काम पार पडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र तीन-चार दिवस पाहायला मिळाले. ग्राहकांच्या लांबच लांब रांगा व लगबग पाहून अनेकांना ही बाब कुतूहलाची वाटली. यावर्षी शहरात फराळ विक्रीची अनेक पर्याय उपलब्ध करतानाही ग्राहकांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. प्रतिष्ठानने यावर्षी दुष्काळसदृश्य परिस्थितीतही विक्रमी फराळ विक्री केली. (वार्ताहर)दिवाळी सणादरम्यान शेतीची अनेक प्रकारची कामे सुरू असल्याने शेतकरी, कष्टकरी महिलांना फराळ बनवण्यास सवड नसते. ही प्रमुख समस्या डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांना भावणारे शेव, चिवडा, करंजी, लाडू, चकली आदि पदार्थांची उपलब्धता करून देण्यात आली होती. काही अपवादवगळता ७० रु. प्रतिकिलो प्रतिपॅकेट याप्रमाणे या पदार्थाची विक्री करण्यात आली.
६३ हजार किलो फराळाची विक्री
By admin | Updated: November 5, 2016 00:05 IST