याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जम्मू-काश्मीर येथे लष्करात सेवा बजावत असलेले जवान प्रदीप कचरू बोगीर यांच्या नव्या घराचे बोगीरवाडीत काम सुरू आहे. प्रदीप दोन महिन्यांपासून रजेवर होते. २० मार्चला ते कर्तव्यावर परतले. त्यावेळीच घराच्या कामासाठी १ लाख ४५ हजार रुपये ठेवून गेले होते. चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री त्या पैशांवरच डल्ला मारला. अज्ञात चोरट्याने दरवाजा नसलेल्या पडवीतील लोखंडी पत्र्याची कोठी उचलून नेऊन रोकड लंपास केली. भास्कर निवृत्ती बोगीर यांच्या शेतात कडीकोयंडा तोडलेली लोखंडी कोठी आढळून आली. लोखंडी कोठीतील रोख १ लाख ४५ हजार रुपये लंपास करण्यात आले होते. याबाबत गणेश बोगीर यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आवारी पुढील तपास करीत आहेत.
इन्फो
पडवीतून कोठीवर मारला डल्ला
जवान प्रदीप यांचे कुटुंबीय शेती करून उदरनिर्वाह करतात. नव्या घराचे बांधकाम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते दरवाजा नसलेल्या पडवीत वास्तव्यास आहेत. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सुमनबाई बोगीर यांना जाग आली. कोठीत पैसे असल्याने सुरक्षा महत्त्वाची होती. काळजीपोटी त्यांनी कोठीकडे नजर टाकली. मात्र, कोठी आढळून आली नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.