------
रमजानपुरात घरफोडी
मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागात नूरनगर चक्कीच्या शेजारी अबु हुरेरा मशिदीजवळ घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. खालदाबानो अकलाख अहमद (३८) यांनी रमजानपुरा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार डी. एम. पवार करीत आहेत.
-----
मोसम पुलावर अज्ञात वाहनाची धडक; एक ठार
मालेगाव : शहरातील मोसम पुलावरील महात्मा फुले पुतळा ते जुना आग्रारोड, मराठा खानावळजवळ गेल्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आशिष बाबुलाल गांगुर्डे (४०, रा. क्रांतीनगर, संगमेश्वर) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. नरेंद्र बाबुलाल गांगुर्डे (४५, रा. ठेंगोडा) यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. आशिष गांगुर्डे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने रक्तस्राव झाला. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. आशिष गांगुर्डे यांच्या मरणास कारणीभूत झाल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.