नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत होऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक दि. २ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण सुरू असून, नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचेही काम हाती घेण्यात आले आहे. या कामांना गती देण्याची सूचना कुंटे यांनी केली. याशिवाय, अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंत साकारण्यात येणारा स्मार्ट रोड, सेफ नाशिक स्मार्ट नाशिक प्रकल्पांतर्गत शहरात बसविण्यात येणारी सीसीटीव्ही यंत्रणा, पार्किंग मॅनेजमेंट आदी कामांचाही आढावा घेण्यात आला. सल्लागार संस्थेच्या कामांचा आढावा घेऊन त्यांनाही लवकरात लवकर डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीला स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होता.
स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत प्रकल्पांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:15 IST