पांढुर्ली : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली परिसरात गेल्या आठ दिवसात परतीच्या पावसाने अक्षरश: धुडगूस घातला. मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला पिके सडल्याने शेतकऱ्यांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण नेहमी जास्त असते. मात्र गेल्या चार वर्षांपासून पश्चिम पट्ट्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पांढुर्ली परिसरातील शेतकरी भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतो. यावर्षी या भागातील शेतकऱ्यांनी काकडी, टमाटा, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, मेथी या भाजीपाल्यासह सोयाबिन, मका या खरीप हंगामातील पिकांची लागवड केली होती. यावर्षी बऱ्यापैकी झालेल्या पावसाने पिके जोमात होती. मात्र गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने कहर केला आहे. गेल्या दहा-बारा दिवसात दिवसाआड का होईना जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. शनिवार व रविवारी सायंकाळी पांढुर्ली परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. अनेक शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे भाजीपालावर्गीय पिके सडली आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून व नातेवाइकांकडून हातउसणे पैसे घेऊन भाजीपाला व खरीप पिकांची लागवड केली होती. अगोदर पाण्याअभावी पिके संकटात सापडत होती. यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने जास्त पाण्यामुळे पिके सडली आहेत. भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव पडला आहे. त्यामुळे वाचलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून त्यावर फवारणीची वेळ आल्याचे चित्र आहे. अगोदरच अनेक पिकांचे नुकसान झालेले असताना उर्वरित पीके रोगांच्या प्रादुर्भावातून वाचविण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. परतीच्या पावसामुळे पांढुर्ली, घोरवड, शिवडा, आगासखिंड, बेलू या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
पांढुर्ली परिसराला परतीच्या पावसाचा तडाखा
By admin | Updated: September 27, 2016 23:03 IST