पिंपळगाव येथे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून जिल्हा बँकेची शाखा सुरू होती. या बँकेला पिंपळगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी, खडकतळे व वाखारी येथील विविध कार्यकारी सोसायट्यांचे कामकाज जोडलेले होते. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे कर्जव्यवहार, घेणे-देणे येथील शाखेत सुरू होते; परंतु जिल्हा बँकेत प्रशासकाची नेमणूक होताच समाधानकारक कर्ज वसुली न करणाऱ्या बँकांचे स्थलांतर करून त्या हलविण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे पिंपळगाव वाखारी येथील जिल्हा बँकेचे कामकाज बंद करून ते देवळा येथील शाखेत संलग्न करण्यात आले. यामुळे परिसरातील सभासद शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने गैरसोय करून अडवणूक केल्याची भावना सभासद शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेचे हे स्थलांतर रद्द करून पिंपळगाव वाखारी येथील शाखा पूर्ववत सुरू करण्याची मागणी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंपळगाव वाखारीतील जिल्हा बँक शाखेचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST