सटाणा : उन्हाळ कांद्याच्या आवकेत अचानक पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे गुरुवारी कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली. सटाणा बाजार समिती आवारात कांदा सरासरी प्रतिक्विंटल २१०० ते २२०० रु पयांनी विकला गेला.ढगाळ व दमट वातावरणामुळे चाळींमध्ये साठवलेला कांदा सडू लागला आहे. त्यातच सलग तीन दिवस बाजार समित्या बंद असल्यामुळे साहजिकच गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या आवकेत तेजी आली आहे. गुरुवारी बाजार समिती आवारात तब्बल ६७२ वाहने कांदा विक्र ीसाठी आले होते. त्यामुळे वीस हजारहून अधिक क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. तुलनेत बुधवारी ५१० वाहने कांदा विक्र ीसाठी आले होते. एकाच दिवसात कांद्याच्या आवकेत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे कांद्याच्या आज १५० ते २०० रु पयांनी घसरण झाली. प्रतिक्विंटल २१०० ते २२०० रुपये कांद्याला भाव मिळाला. दोन दिवस कांद्याच्या आवकेत तेजी राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
कांद्याच्या आवकेत तेजी, भावात दोनशे रु पयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:17 IST