वन्यजीवांची तस्करी कायद्याने अजामीनपात्र असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानाही नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कॉलेज रोड परिसरातील सौरव एक्झॉस्टिक व ॲक्वेटिक पेट स्टोर नावाच्या दुकानात पूर्ण वाढ झालेला सुमारे तीन ते चार वर्षे वयाचा शेकरू हा वन्यप्राणी विक्रीसाठी पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांच्यासमक्ष शिताफीने दुकानावर छापा टाकला. यावेळी शेकरूला रेस्क्यू करण्यात आले तसेच दुकानमालक संशयित आरोपी सौरव रमेश गोलाईत (२३, रा. दसक, जेलरोड) यास वनविभागाच्या कारवाई पथकाने ताब्यात घेतले आहे. सदाहरित किंवा निमसदाहरित वनात आढळणारा अत्यंत लाजाळू असा वन्यप्राणी म्हणून शेकरूची ओळख आहे. काळानुरूप जंगलांचा होणारा ऱ्हास या वन्यप्राण्याच्या जीवावर उठला असताना आता तस्करांनीही या जीवाकडे वक्रदृष्टी केल्याने संताप व्यक्त होत आहे.
--इन्फो--
शेकरूचे संवर्धन धोक्यात!
पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरूच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरू विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेकरू वन्यजीव अत्यंत चपळ व तितकेच लाजाळू असतानाही विक्रीसाठी संशयिताने त्यास कसे व कोणाच्या मदतीने आणि कोठून जेरबंद केले, हा मोठा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात वनविभागाला कसोशीने खोलवर तपास करावा लागणार आहे, कारण शेकरू या वन्यजीवाची तस्करी होणे ही धक्कादायक बाब आहे.
--इन्फो--
तीन वर्षांपूर्वी आणली होती मगरीची पिल्ले!
संशयित सौरव गोलाईत याने २०१८ साली मगरीच्या पिल्ले विक्रीसाठी सारडा सर्कल या भागात आणली असता शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छापा टाकून रंगेहात त्यास पकडले होते. यावेळी मगरीची आठ पिल्ले आणि दोन कासवदेखील त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले होते. यावेळीही संशयित सौरव व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जामिनावर सोडले होते.
कोट--
शेकरू वन्यप्राणी विक्रीसाठी थेट दुकानात आणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संशयित दुकानमालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर यापूर्वीही मगरीच्या पिल्लांच्या विक्रीचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळीही तो अशाच प्रकारे पोलिसांच्या छाप्यात पकडला गेला होता. वारंवार दुर्मीळ अशा वन्यजीवांची तस्करी करण्यात त्याचा सहभाग दिसून येत असून त्याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- गणेश झोळे, सहायक वनसंरक्षक
180921\18nsk_43_18092021_13.jpg
रेस्क्यु केलेले शेकरु