नितीन बोरसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : कांद्याचे भाव स्थिर :1 लाख आवक :डाळिंबाची लाली वाढली, भाव शंभरी पार
नितीन बोरसे @ सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा आणि नामपूर बाजार समिती आवारात गेल्या आठवड्यात कांद्याच्या भावात चढ-उतार दिसून आला. आठवड्यात दोन्ही बाजार समित्या मिळून सरासरी १ लाख १० हजार क्विंटल आवक होती. आवक वाढली मात्र भाव प्रति क्विंटल सरासरी १४५० रुपयांपर्यंत स्थिर राहिला. डाळिंबदेखील सरत्या आठवड्यात मागणी वाढल्याने प्रति किलो ७५ ते ८० रुपये भाव मिळाला.
सटाणा बाजार समिती आवारात गेल्या आठवड्यात उन्हाळ कांद्याची सरासरी आवक ५४ हजार क्विंटल, तर नामपूरमध्ये सरासरी ६२ हजार क्विंटल आवक होती. आठवड्याच्या शेवटी साडेपंधरा हजार क्विंटलहून अधिक असलेली आवक सुरुवातीच्या दोन दिवसांत साडेबारा हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती. मात्र, सरत्या आठवड्यात तीन हजार क्विंटलने कांदा आवक तेजीत असली तरी भाव मात्र मागणीमुळे १४५० रुपयांपर्यंत स्थिर राहिले. नामपूरला सरासरी 1400 ते 1450, तर जास्तीत जास्त 1675 रुपये कांद्याला भाव राहिला. बागलाणमध्ये लाल कांद्याची यंदा बऱ्यापैकी लागवड आहे. त्यामुळे आगामी काळात उन्हाळ कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे.
डाळिंबाची लाली वाढली....
यंदा डाळिंबाचे भगवा वाण तेजीत आहे. सटाणा व नामपूर बाजार समिती आवारात गेल्या आठवड्यात वीस किलो वजनाचे 30 हजार क्रेट इतकी आवक राहिली. डाळिंबाला कोलकाता, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, जयपूर या परराज्यातील बाजारपेठांमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाने किलोच्या भावात शंभरी पार केली आहे, तर स्थानिक बाजार आवारात जास्तीत जास्त ८० ते ८५ रुपये, तर सरासरी ७० ते ७५ रुपये भाव राहिला. त्यामुळे यंदा डाळिंबाची लाली वाढली आहे.
तेलबियांचे भाव घसरले
सटाणा बाजार आवारात भुईमूग शेंगा, सूर्यफूल, तीळ आणि सोयाबीनची किरकोळ आवक होती. बाजारपेठेत तेलाचे भाव गगनाला भिडले असताना तेल बियांच्या किमती मात्र घसरल्या आहेत. गेल्या आठवड्यात भुईमूग शेंग सरासरी ४ ते ४६०० रुपये प्रति क्विंटल विकली गेली. तीळ ९ हजार २००, तर सोयाबीन ६ हजार ७००, सूर्यफूल ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
भुसार मालाचे भाव स्थिर...
गहू, बाजरी, ज्वारी या भुसार मालाची आवक सुरू असून गेल्या आठवड्यात गहू सरासरी प्रति क्विंटल १८५० ते २००० रुपये भाव होता. बाजरी सरासरी प्रति क्विंटल १७०० ते १७५० रुपये, ज्वारी सरासरी १५०० ते १५५०, तर मक्याला सरासरी प्रति क्विंटल १७०० ते १८०० रुपये भाव राहिला.
कोट...
उन्हाळ कांदा टप्प्याटप्प्याने चाळीतून विरळणी करून बाजारात आणावा, जेणेकरून गर्दी कमी होऊन मालाला भाव मिळेल, तसेच आगामी काळात अन्य राज्यांतील कांदा पीक बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव कमी होत आहेत. शेतकऱ्यांनी अपेक्षित भाव मिळावा म्हणून चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. हा साठवून ठेवलेला कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणणे आवश्यक आहे.
- श्रीधर कोठावदे, संचालक, सटाणा बाजार समिती