कळवण : तब्बल सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडे उपआवारात शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साक्षीने आडतमुक्त व खुल्या पद्धतीने कांदा लिलाव पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा, तर कांद्याला भाव न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसून आल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती कांदा उत्पादकांची बघावयास मिळाली. आडतमुक्त खुल्या पद्धतीने कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी ३३० वाहनांतून सात हजार ५०० क्विंटल, तर दुसऱ्या दिवशी ४५० वाहनांतून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. खुल्या पद्धतीने होणाऱ्या कांदा लिलावाचे कांदा उत्पादकांनी स्वागत केले.नाकोडे येथील उपआवारात जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या हस्ते व कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या उपस्थितीत कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कांदा व्यापारी मुरलीधर अमृतकार, कळवण बाजार समितीचे संचालक हेमंत बोरसे, योगेश महाजन, दादाजी ठुबे, नितीन अमृतकार, सचिन पगार, भालचंद्र वाघ आदि व्यापारी बांधवांनी लिलावात सहभाग नोंदवित कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातून ट्रॅक्टर, पिकअप वाहनांतून आलेल्या कांदा लिलावाला बोली लावली. पहिल्या दिवशी गुरुवारी कमीतकमी २०० रु पये तर सरासरी ६०० आणि जास्तीत जास्त ७३५ रु पये भावाने, तर आज शुक्र वारी दुसऱ्या दिवशी सरासरी ६००, तर जास्तीत जास्त ८८० रुपये भावाने कांद्याचा खुल्या पारंपरिक पद्धतीने लिलाव करण्यात आला.शासनाने ५ जुलै २०१६ रोजीच्या अध्यादेशानुसार फळे, भाजीपाला, कांदा व बटाटे नियमनमुक्त केल्याने आडत ही खरेदीदाराकडून घ्यायची असा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होऊन बाजार समित्या ओस पडायच्या मार्गावर असताना, तब्बल सव्वा महिन्यानंतर आडतमुक्त खुला कांदा लिलाव करण्याचा निर्णय झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरलेले दिसून आल्याने कांद्याचा लिलाव कोणत्या पद्धतीने होतात हे बघण्यासाठी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाकोडे उपआवारात एकच गर्दी केली होती.खुल्या पद्धतीने आजपासून सुरू होणाऱ्या कांदा लिलावासाठी नाकोडे उपआवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि कांदा भावाची उत्सुकता दिसून येत होती. कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता ही कटाक्षाने चिंतावणारी अशीच होती. बाजारभाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.कांदा हे नाशवंत पिकाचे होणारे नुकसान, शेतकरी बांधवांच्या समस्या व अडचणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणे शासनाच्य दि. ६ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या निर्णयानुसार प्रायोगिक तत्त्वावर नवीन कांदा बारदान (जूट) ४५ किलो गोणी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेली खुली कांदा लिलाव पद्धत व नव्याने सुरू केलेल्या कांदा गोणी पद्धतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन जिल्ह्यातील वातावरण चिघळले होते.या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींची संयुक्त बैठक होऊन खुला कांदा लिलाव सुरू करण्याची विनंती कांदा व्यापारी असोसिएशनला करण्यात आली होती. दि. ९ आॅगस्ट रोजी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमिती बैठकीत केलेल्या विनंतीनुसार कांदा व्यापारी यांनी खुला कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेऊन बाजार समित्यांना कळविल्याने उपसमितीचा अहवाल व शासनाचा निर्णय होईपावेतो शेतकऱ्यांनी कांदा प्रतवारी करून खुला कांदा ट्रॅक्टर ट्रॉली/ पिकअपमध्ये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारावर विक्र ीसाठी आणावा. सदर कांदा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अडत वसूल केली जाणार नाही याकरिता कांदा उत्पादक शेतकरी बांधव, कामगार, व्यापारी व सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, सचिव रवींद्र हिरे यांनी केले आहे. (वार्ताहर)
कळवणला खुल्या पद्धतीने कांदा लिलाव
By admin | Updated: August 12, 2016 22:21 IST