दत्ता दिघोळे जायगावमुला-मुलींची पसंती झाल्यानंतर रिवाजाप्रमाणे बोलणीचे सोपस्कार पूर्ण होतात. मुहूर्त ठरविण्यासाठी ब्रह्मवृंदाला पाचारण केले जाते. सोयीनुसार मुहूर्त ठरवत असतानाच अचानक मुलगी पुढे येते आणि आपली एक अट असल्याची विनंती करते. अट कोणती असेल, या विचाराने वधू-वर पक्षाचे पाहुणे एकमेकांकडे पाहतात. विवाह सोहळ्यापूर्वी वर पक्षाकडील मंडळींनी घरात शौचालय बांधावे, अशी अट मुलगी मोठ्या धाडसाने सांगते. त्यामुळे वातावण काहीसे गंभीर होते. मात्र वर पक्षातील मंडळींनी मुलीची अट मोठ्या मनाने आपल्याला मान्य असल्याचे सांगून आपण अट पूर्ण करण्यास तयार असल्याचे सांगताच उत्साहाने विवाह मुहूर्त निश्चित केला जातो. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील घटनेमुळे मुलींच्या धाडसी मागणीचे कौतुक होत आहे. मुलीने वर पक्षाच्या नातेवाइकांना लग्नाची तारीख ठरवण्याआधी घरात शौचालय बांधा मगच लग्नाची तारीख धरा, अशी विनंती वजा अट टाकली. त्यामुळे होणारा संबंध जुळण्याआधी बिघडतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र वर पक्षातील मंडळींनी अतिशय समजूददारीची व मुलीची मागणी रास्त असल्याचे सांगत अशी मुलगी आपल्या घरची सून झाल्यास आनंद होईल असे सांगताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. घरात विवाहाची चर्चा सुरू असतानाच होणाऱ्या नववधूने घातलेल्या अटीचा विचार करता तिने दाखवलेल्या धाडसाचे व स्वत:बरोबरच समाजाला स्वच्छतेबाबत घालून दिलेल्या सामाजिक संदेशाचा विचार सर्वांना पटला. मुलीने घातलेली अट तीन दिवसांत पूर्ण केल्यानंतर लग्नाची तिथी निश्चित करण्यात आली. मुलाकडच्या नातेवाइकांनीही अट पूर्ण केल्यानंतर विवाहाचा २२ फेब्रुवारी हा मुहूर्त निश्ति केला. या विवाह सोहळ्याची त्यामुळे पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्र, सोशल मीडिया तसेच शाळांमध्ये विविध सामाजिक संस्था याबाबत जनजागृती करत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा थेट मनावर परिणाम होतानाचे दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून चिंचोली येथील पोलीसपाटील मोहन सांगळे यांची कन्या मनीषा हिचे कौतुक होत आहे. गावातीलच शंकर नामदेव हुळहुळे या युवकाशी लग्नाची बोलणी सुरू असतानाच मनीषाला आपल्या होणाऱ्या सासरी शौचालय नसल्याचे कळताच तिथी निश्चित करण्याआधी अट पूर्ण करण्याची मागणी केली. शौचालय असेल तरच लग्न करणार, अशी सर्वांसमोर अट घालून सर्वांनाच शौचालयाचे महत्त्व मनीषाने पटवून दिले. शौचालयाची अट मान्य केल्यानंतर विवाह मुहूर्त निश्चित झाला. तो चर्चेचा विषय बनला आहे.
अट मान्य झाल्यानंतर निश्चित झाला मुहूर्त!
By admin | Updated: February 3, 2016 22:10 IST