नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदिवासी भागात कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय विकासासाठी ‘न्यूट्री स्मार्ट व्हिलेज’ प्रयोग केला जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगावात पोषण सुरक्षिततेसाठी परसबाग विकसनाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. आदिवासी भागात विशेषत: महिला आणि लहान मुलांमध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वांची कमतरता आढळत असल्याने केंद्राने भरपूर प्रमाणात प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे असणाऱ्या भाजीपाला पिकांची निवड करून या भाजीपाल्याचे बियाणे येथील महिलांना पुरविले आहेत. प्रत्येक घरातील परसात भाजीपाला लावण्यासाठी या महिलांना त्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. परसबागेसाठी कृषी विज्ञान केंद्राकडून महिलांना शेवगा, वाल, गवार, बीट, मेथी, पालक, वांगी, मिरची, मुळा, वेलवर्गीय भाजीपाला अशा १४ प्रकारच्या भाजीपाला पिकांचे बियाणे पुरविण्यात आले. केंद्रातील शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली या परसबागांचे संगोपन करण्यात येईल तसेच संपूर्ण हंगामात या परसबागांना भेटी देऊन येणाºया समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. जातेगावला ‘न्यूट्री स्मार्ट व्हिलेज’ बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी परसबागेच्या माध्यमातून पहिले पाऊल टाकले आहे. या गावातील एकूण ३२ महिलांना परसबाग विकसनासाठी भाजीपाल्याचे बियाणे पुरविण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत महिलांना भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले कृषी, विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ज्ञ अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्र म राबविला जात आहे.
आता मुक्त विद्यापीठ घडविणार ‘न्यूट्री स्मार्ट व्हिलेज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:38 IST