सुनील तटकरे : अभियाांत्रिकी प्रबोधिनी प्रशिक्षण सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमनाशिक : आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावर होत असलेले विविध बदल अंगीकारून त्याप्रमाणे सुविधा पुरविणार्या अभियंत्यांची आज गरज असून, प्रबोधिनीने अशा प्रकारचे अष्टपैलू अभियंते तयार करावेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केले. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कालिदास कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जगात आज उंचच उंच इमारती बांधण्याचे काम सुरू झाले आहे. जमिनीच्या कमतरतेमुळे असे होत असताना, त्या उंच इमारतीत सर्वच रहिवाशांना सर्व सुविधा कशा पोहोचविल्या जातील याची खबरदारी अभियंत्यांना घ्यावी लागेल. धरण बांधताना केवळ धरणाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी अभियंत्यावर नसून त्या पाण्याचे शेतकर्यांपर्यंत नियोजनही अभियंत्यालाच करावे लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्तारावर विचार करून त्याप्रमाणे स्थापत्यांची निर्मिती करतानाच पाण्यावरून होणारे संभाव्य तिसरे महायुद्ध टाळण्याची मोठी जबाबदारी अभियंत्यांवर आली आहे. त्यामुळे प्लंबिंगचा अभ्यास करण्याची वेळही अभियंत्यांवर आली आहे. यासारख्या विविध क्षेत्रातील अभ्यास आता अभियंत्यांना करावा लागणार असून, त्यांना अष्टपैलूच व्हावे लागेल. त्याशिवाय उज्ज्वल भवितव्याची नांदी दिसणार नाही, असेही तटकरे म्हणाले. अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीमधून बाहेर पडणारे अभियंते तावून सुलाखून बाहेर येतात यात शंका नाही; परंतु जर त्यांना शिक्षणासाठी आणखी काही सुविधा पुरवायच्या असतील आणि त्यासाठी निधीची आवश्यकता असेल तर तो दिला जाईल, असे आश्वासनही तटकरे यांनी दिले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता मनोज केंद्रे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रबोधिनीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर विशेष कामगिरी करणार्या अभियंत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक चं. आ. बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना प्रबोधिनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी सध्या अभियंत्यांसमोर असलेल्या विविध आव्हानांचा परामर्श घेतला आणि त्यादृष्टीने नवीन प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर एकनाथ पाटील, अधीक्षक अभियंता जी. जी. बैरागी, शं. मा. उपासे, रा. गो. शुक्ल, ह. का. गोसावी आदि उपस्थित होते. संजय मुरकुटे व किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले. जी. जी. बैरागी यांनी आभार मानले. पर्यावरणाशी सांगड घाला : चितळेआंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ माधव चितळे यांनी प्रशिक्षण केंद्रांमध्ये आणि अभियंत्यांमध्ये आवश्यक असलेले बदल आपल्या भाषणात नमूद केले. खासगी प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था जिथे आधुनिक प्रशिक्षण देत आधुनिक अभियंते घडवित आहेत तिथे शासकीय प्रशिक्षण संस्थेने मागे राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी अभियांत्रिकी प्रशिक्षणात व्यवहाराचा जास्त उपयोग व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी फ्रान्सच्या पद्धतीचा अंगीकार करण्याच्या सूचना केल्या. याबरोबरच वास्तुनिर्मिती, व्यवस्थापन आणि पर्यावरण यांची सांगड घालण्याची सूचनाही चितळे यांनी केली.
अष्टपैलू अभियंता निर्मितीची गरज
By admin | Updated: May 20, 2014 00:36 IST