Nashik Municipal Election Result 2026 : अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:12 IST2026-01-22T14:11:27+5:302026-01-22T14:12:40+5:30
Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप ९० ते ९५ जागांपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, अंतर्गत चुकांमुळे पक्षाला २० जागांवर फटका बसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Nashik Municipal Election Result 2026 : अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का
नाशिक : महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप ९० ते ९५ जागांपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, अंतर्गत चुकांमुळे पक्षाला २० जागांवर फटका बसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. काही ठिकाणी अट्टाहास आणि गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजप कार्यालयात पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, विजय साने, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, संभाजीनगर, नाशिक येथे आपली मित्रपक्षाशी थेट लढत होती. युती केली असती तर गटनेतेपदाच्या निर्णयाआधीच भाजप नगरसेवकांची संमतीपत्रे बॉण्ड पेपरवर घेतली. कदाचित इतक्या जागा मिळाल्या नसत्या. नाशिकमध्ये चुका टाळल्या असत्या तर प्रतिस्पर्ध्याना कमी जागा मिळाल्या असत्या असा टोलाही त्यांनी शिंदेसेनेला लगावला.
दुसऱ्यांदा निवडून यायचे असेल तर काम करून दाखवावे लागेल. लवकरच गटनेत्याची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयात ठेवण्यात आलेल्या बॉण्डवर सर्व नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पक्षाची प्रतिमा सांभाळा...
भाजपमध्ये पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. जुन्यांना ते माहीत आहे. आता सर्वांनी पक्षशिस्त पाळली पाहिजे. पक्षाची ध्येयधोरणे समजण्यासाठी लवकरच अभ्यासवर्ग घेण्यात येणार असल्याचे सांगत जाहीरपणे काहीही बोलू नये. पक्ष सांगेल तसेच वागावे लागेल. पक्षाची इभ्रत जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असा कानमंत्रही महाजन यांनी दिला.