नाशिक शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कोविड योध्दे मग फ्रंटलाइन वर्कर आणि नंतर अन्य नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु एप्रिल महिन्यापासून मात्र लसींची टंचाई जाणवू लागली. त्याच काळात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत जोरात असल्याने बेडदेखील मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांची गर्दी आणि दुसरीकडे लस नाही अशा स्थितीत लसीकरण सुरू असताना १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याने आणखीनच गेांधळ उडाला. आता तर लस येणार किंवा नाही याची सायंकाळपर्यंत खात्री नसते. दुसऱ्या लाटेतील भयावर चित्र बघता नाशिक महापालिकेने तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना करताना दुसरीकडे लसीकरणावर भर देण्याचे ठरवले. त्यासाठीच पाच लाख लस खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी लस खरेदीसाठी निविदा काढण्याचा आग्रह धरला असला तरी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मात्र निविदा काढून लस लवकर मिळणार नसल्याने मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकेशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत त्यांच्या निविदाधारकांकडून लस खरेदी करण्याचे ठरवण्यात आले. आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात मुंबई महापालिकेशी संपर्क साधून लस खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर मुंबई महापालिकेत स्पुतनिक लस पुरवण्यासाठी निविदा दाखल करणाऱ्या पुरवठादाराने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. त्यानुसार पाच लाख डोस खरेदी करण्याची तयारी आयुक्तांनी लिखित पत्राव्दारे दाखवली. मात्र आता मुंबई महापालिकेने सर्वच निविदा अपात्र ठरवल्यानंतर आता प्रस्ताव बारगळला.
इन्फो..
महापालिकेच्या वतीने स्फुतनिक लस दोन हजार रुपयांना एक अशा दराने खरेदी करण्यात येणार हेाती. या लसीचे दोन डोस घ्यावे लागत नाहीत. एकच लस पुरेशी असते. खासगी रुग्णालयातदेखील लस उपलब्ध करून देणार होती. खासगी रुग्णालयांना शंभर रुपये अतिरिक्त आकारून २१०० रुपयांना लस देण्याची महापालिका परवानगी देणार होती. मात्र, आता हे नियोजन फसले आहे.
इन्फो..
महापालिकेने आतापर्यंत ३ लाख ९० हजार ४६९ नागरिकांचे लसीकरण केले आहे. यात २ लाख ९७ हजार ५७८ नागरिकांना पहिला तर ९२ हजार ८९१ नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. आता महापालिकेच्या वतीने निविदा मागवायच्या का, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.