नाशिक : देवळाली कॅम्पमधील लष्करी जवान डीएस रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्त्ये- प्रकरणी ‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार संशयित पूनम अग्रवाल (रा़ दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद या दोघांवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जवानास आत्महत्त्येस प्रवृत्त करणे तसेच लष्करी हद्दीत प्रवेश करून जवानांचे फोटो व व्हिडिओ क्लिप काढून त्या सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी आॅफिशियल सिक्रेट अॅक्टन्वये सोमवारी (दि़ २७) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ अग्रवाल व दीपचंद यांनी फेब्रुवारीमध्ये बडीज ड्युटीच्या नावाखाली केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मॅथ्यू यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडून जवानांच्या पिळवणुकीबाबत तक्रार केली होती़ देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्टिलरी सेंटरमध्ये लान्स नायक तथा सहायक पदावर कार्यरत असलेले डीएस रॉय मॅथ्यू हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते़ २ मार्च २०१७ रोजी त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकीमध्ये आढळून आला़ त्याचा तपास करताना स्टींग आॅपरेशनच्या घटनेचा प्रकार उघड झाला. गेल्याच फेब्रुवारी महिन्यात ‘द क्विंट’ या वेबसाइटच्या पत्रकार पूनम अग्रवाल व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद या दोघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लष्करी जवानांच्या केल्या जाणाऱ्या पिळवणुकीबाबत बडीज ड्युटीच्या नावाखाली कॅम्पमधील हेगलाइन महिंद्रा इनकोच या ठिकाणी स्टिंग आॅपरेशन केले होते़ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या स्टिंगमध्ये सहायक पदावर काम करत असलेले लान्स नायक रॉय मॅथ्यू यांचा व्हिडियो असून, त्यांनी लष्करातील अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रश्नही उपस्थित केले होते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीला दिल्या जाणाऱ्या सहायक कर्मचाऱ्यांना संबंधित कुटुंबीयांच्या घरातील मुलांची शाळेत ने-आण करणे, कुत्र्याला फिरवून आणणे, कपडे धुणे, अशी कामे करावी लागत असल्याचे चित्रफितीतून समोर आले होते. सोशल मीडियावर हे स्टिंग व्हायरल झाल्यानंतर आपले कोर्ट मार्शल होईल, अशी भीती मॅथ्यू यांनी त्या व्हीडीओत व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. पत्रकार पूनम अग्रवाल यांनी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्या मदतीने आर्टिलरी क्षेत्रात शूटिंगला मनाई असतानाही, तिथे शूटिंग करून व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या. या व्हिडिओ क्लिपमुळे तणावात असलेल्या मॅथ्यू यांनी आत्महत्त्या केल्याचा आरोप दोघांवर आहे. मॅथ्यू हे लष्कराच्या तोफखाना विभागात अर्थात आर्टिलरीत गनरमध्ये कार्यरत होते़ या स्टिंग आॅपरेशननंतर दबावात येऊन तणावाखाली मॅथ्यू यांनी आत्महत्त्या केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले होते. (प्रतिनिधी) लष्कराकडून महत्त्वाच्या बाबींवर बोटदेवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात लान्स नायक डब्ल्यू नरेशकुमार श्री अमितचंद्र जाटव (३१, रा़स्कूल आॅफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अग्रवाल व दीपचंद यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यामध्ये लष्कराने दोन महत्त्वाच्या गोष्टींवर बोट ठेवले आहे़ त्यामध्ये एक बेकायदा संवेदनशील भागात प्रवेश करून सहायक पदावर असलेल्या व्यक्तीस अनेक प्रश्न विचारून गोपनीय माहिती मिळविणे व त्याचे चित्रिकरण करणे याचा समावेश आहे़ डायरी, व्हिडिओचा तपास?लष्करी जवान रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्येनंतर पोलीसांना तपासणीत त्यांचा मोबाइल व मल्याळम भाषेतील डायरी सापडली होती़ या डायरीचे भाषांतर तसेच मोबाइलमधील व्हिडिओमध्ये तो सर्वांची माफी मागत असल्याचे सांगण्यात येत होते़ हा मोबाइल तांत्रिक शाखेकडे चौकशीसाठी देण्यात आल्याचे तसेच फुटेज व व्हिडिओबाबत चौकशी केली जाणार असल्याचे तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कडक करवाई केली जाणार असल्याचे सुतोवाच संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केले होते़ मात्र, या तपासाचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे़सैनिकांच्या व्यथेला फुटली वाचा स्टिंग आॅपरेशनमध्ये लष्करी जवान रॉय मॅथ्यू याने व्हिडिओतून वरिष्ठ अधिकारी सैनिकांना कसे घरगड्यासारखे राबवून घेतात? त्यामध्ये मुलांना शाळेत सोडणे, कुत्र्यांना फिरविणे, भांडी घासणे अशी कामे करून घेतली जात असल्याचे चित्रीकरण करून सैनिकांच्या व्यथेला वाचा फोडली होती़ मॅथ्यूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लष्करी जवानांची होत असलेली पिळवणूक समोर आली होती़विनापरवानगी लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून त्या ठिकाणची तसेच लष्करी जवान मॅथ्यूसह इतर जवानांची व्हिडिओ क्लिप काढून स्टिंग केले़ या स्टिंगचे चुकीच्या प्रकारे सादरीकरण तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर व्हायरल करून आर्मीची बदनामी केली़ या क्लिपमुळे तणावाखाली आलेला लष्करी जवान मॅथ्यूने आत्महत्त्या केली़ त्यामुळे या दोघांवर आॅफिशिअल सिक्रेट अॅक्ट व आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़- विनायक लोकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे
मॅथ्यू आत्महत्त्या; महिला पत्रकारासह दोघांवर गुन्हा
By admin | Updated: March 29, 2017 01:27 IST