जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण लासलगाव येथे आढळून आल्यानंतर मालेगावी गेल्या ८ एप्रिल २०२० रोजी शहरातील गुलाबपार्क, कमालपुरा, मोमीनपुरा, मदिनाबाग भागात पाच कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. यामुळे शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वर्षभरापूर्वी कोरोनावर औषधोपचार नसल्याने आरोग्य यंत्रणाही हतबल झाली होती. दिवसागणिक रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर महापालिका, पोलीस, महसूल, आरोग्य विभागाने दिवसरात्र मेहनत करून मालेगावातील कोरोना नियंत्रणात आणला होता. त्यावेळी राज्यभरात मालेगाव पॅटर्न चर्चिला गेला होता. नोव्हेंबर २०२०मध्ये मालेगाव शहरात केवळ १४८ रुग्ण होते. मालेगावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू होती. यानंतर मात्र नागरिकांनी बेजबाबदारपणा दाखवत लग्न सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने सुरू केले. परिणामी गेल्या दाेन महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नाहीत. सद्य:स्थितीत ३४२ सक्रिय रुग्ण आहेत तर गृहविलगीकरणात (होम आयसोलेशन) एक हजार ६१४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मालेगावकरांची पुन्हा कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू झाली आहे. वर्षभरानंतरही कोरोनाची परिस्थिती सुधारत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. एकूणच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अनिवार्य बनले आहे.
इन्फो
महिने - एकूण रुग्णसंख्या - मृत्यू - बरे झालेले - उपचार घेणारे
८ एप्रिल २०२० - ५ - १ - ० - ४
८ मे २०२० - ४१७ - १४ - २८ - ३७५
८ जून २०२० - ८५४ - ६४ - ७०० - ९०
८ जुलै २०२० - ११०५ - ७६ - ९०२ - १२७
८ ऑगस्ट २०२० - १४९३ - ८९ - ११८० - २२४
८ सप्टेंबर २०२० - २९४३ - ११९ - २११६ - ६२८
८ ऑक्टोबर २०२० - ३९२८ - १६० - ३३६२ - ४०६
८ नोव्हेंबर २०२० - ४१९३ - १६८ - ३८९७ - १२८
८ डिसेंबर २०२० - ४४१२ - १७२ - ४०९३ - १४५
८ जानेवारी २०२१ - ४६३५ - १७५ - ४३०३ - १५७
८ फेब्रुवारी २०२१ - ४७५३ - १७६ - ४४२६ - १५१
८ मार्च २०२१ - ५४४३ - १७७ - ४८५१ - ३९०
८ एप्रिल २०२१ - ९३३५ - २१६ - ६९८५ - २१३४