नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून प्रमुख आखाड्यांचे खालसे नाशिकला येत असतात. कुंभासाठी येणाऱ्या साधू-महंतांची व्यवस्था स्थानिक आखाडे व आश्रमांनाच करावी लागत असते. त्यासाठी मोठा खर्च येत असतो. आखाड्यांचे साधू-महंत हे स्थानिक आखाडे व आश्रमांमध्ये उतरत असल्याने शासनाने तेथील सोयीसुविधांवर खर्च करण्यासाठी निधी दिला पाहिजे, अशी भूमिका पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाड्याचे महंत भक्तिचरणदास यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. दरम्यान, शाहीस्नानप्रसंगी पारंपरिक शाही मार्गानेच साधू-संतांची मिरवणूक जाणार असून, प्रशासनाने शाही मार्गाच्या सुशोभिकरणाची कामे तातडीने घेण्याची गरज असल्याचेही महंत भक्तिचरणदास यांनी सांगितले.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत बोलताना महंत भक्तिचरणदास यांनी सांगितले, दर सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी साधुग्रामसाठी उपलब्ध करून द्यावयाच्या जागेची समस्या उभी राहत असते. मागील सिंहस्थात शासनाने ५७ एकर जागा खरेदी केली, परंतु सुमारे तीनशे एकर जागेची गरज आहे. शहराचा विस्तार वेगाने होतो आहे आणि जमिनींचे भावही वाढत आहेत. प्रशासनाने आत्ताच कायमस्वरूपी जागेबाबतचा निर्णय घेणे आवश्यक आहे. संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जागा आरक्षित करायला हवी. सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर या जागेचा वापर महापालिकेला प्रदर्शनीय मैदानासाठी करता येऊ शकेल. नाशिकमध्ये धार्मिक सत्संग अथवा प्रदर्शनीय कार्यक्रम डोंगरे मैदान अथवा गोल्फ क्लब मैदान याठिकाणी होत असतात. परंतु शहरात कायमस्वरूपी असे प्रदर्शनीय मैदान नाही. सिंहस्थासाठी आरक्षित होणाऱ्या जागेचा वापर त्यासाठी करता येऊ शकेल. त्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमून त्यांनी मैदानाची देखरेख करावी. त्यातून मिळणारे उत्पन्न सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या खर्चासाठी उपयुक्त ठरू शकेल. शाहीमार्गाबाबतही वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. मागील कुंभात महापालिकेने पर्यायी शाहीमार्ग उभारला परंतु सदर मार्ग हा पंचवटी अमरधामजवळून जातो. कुंभप्रसंगी जी शाही मिरवणूक निघते त्याच्या अग्रभागी हनुमान ध्वज असतो. धर्मपरंपरेनुसार हनुमान ध्वजाला स्मशानभूमीजवळून नेता येत नाही. त्यामुळे शाही मिरवणूक ही पारंपरिक शाही मार्गानेच न्यावी लागणार आहे. पारंपरिक शाही मार्गावर भाविकांना मिरवणुकीतील सहभागी साधू-संतांचे दर्शन घेता येते. शिवाय पारंपरिक मार्गावर काळाराम मंदिरासह काही मंदिरे असल्याने त्यांचे दर्शन करूनच मिरवणूक पुढे सरकत असते. त्यामुळे पारंपरिक मार्ग बदलता येणार नाही. परिणामी, पारंपरिक शाही मार्गाच्या सुशोभिकरणावर प्रशासनाने भर द्यायला हवा. गेल्या काही वर्षांत या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्याबाबतही प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे, असेही भक्तिचरणदास यांनी सांगितले. नाशिकमध्ये दिगंबर आणि खाकी आखाड्याच्या स्वत:च्या जागा आहेत, तर निर्वाणी आणि निर्माेही आखाड्याअंतर्गत काही आश्रम आहेत. त्यांच्याही स्वत:च्या जागा आहेत. सिंहस्थात साधू-महंत याच आखाडे-आश्रमांमध्ये उतरत असतात. त्यामुळे शासनाने त्र्यंबकेश्वरप्रमाणेच नाशिकमधील आखाड्यांनाही अंतर्गत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करायला हवी. कुंभमेळा काही महिन्यांवर येऊन ठेपला तरी जिल्हा प्रशासन व महापालिका यांच्याकडून कसल्याही हालचाली नाहीत. नियोजन केवळ कागदावरच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका, पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलावून सिंहस्थ कामांना गती दिली पाहिजे. प्रत्येक विभाग वेगवेगळ्या बैठका घेत असतो. त्यामुळे त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो. अलाहाबाद, उज्जैन अथवा हरिद्वार याठिकाणी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार दिलेले असतात, तसे अधिकार याठिकाणीही मिळायला हवेत. सिंहस्थाचे नियोजन करताना प्रशासनाने स्थानिक नागरिक, आखाड्यांचे प्रतिनिधी यांना सहभागी करून घेतले पाहिजे. परंतु प्रशासनपातळीवर नेमके काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. शासनपातळीवर जी शिखर समिती स्थापन झालेली आहे, त्यातही साधू-संतांचा समावेश नाही. साधू-संतांनाच विश्वासात घेऊन कामे होत नसतील तर कुंभमेळा यशस्वी कसा होणार, असा सवालही महंत भक्तिचरणदास यांनी उपस्थित केला. सिंहस्थासाठी यावेळी भाविकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला पाहिजे. वाहनतळांची समस्या नेहमीच उद्भवते. त्याबाबतही दीर्घकालीन उपाययोजना होणे आवश्यक आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा कायापालट होणार आहे. त्यामुळे सूक्ष्म नियोजनावर भर दिला पाहिजे. शासनाकडून येणाऱ्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे कसा होईल, याची दक्षता घेतली पाहिजे. प्रशासनाजवळ आता खूप कमी कालावधी आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेत प्रशासनाला कामे करणे अवघड होऊन बसेल; शिवाय निवडणूक कामाकडेही लक्ष द्यावे लागेल. अशावेळी प्रशासनाने वेळीच जागृत होऊन कामांना सुरुवात करून द्यायला हवी, असेही महंत भक्तिचरणदास यांनी सांगितले.
स्थानिक आखाडे, आश्रमांनाही हवा निधी
By admin | Updated: July 17, 2014 00:27 IST