नाशिक : शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, शहरातील आडगाव, मुंबई नाका, इंदिरानगर व सातपूर या ठिकाणी झालेल्या चार घरफोड्यांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ गोविंदनगरमधील गुरुकृपा रो-हाऊसमधील रहिवासी अशोक गोविंद कुलकर्णी २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या स्वयंपाकगृहाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले़ यामध्ये चेन, अंगठी, ब्रेसलेट, नाणे, रिंगा व रोख रकमेचा समावेश होता़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घरफोडीची दुसरी घटना आडगाव शिवारातील सरस्वतीनगरमध्ये घडली आहे़ लिटल हाऊसमधील रहिवासी राकेश कुमार शर्मा (५४) हे २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४२ हजार ७०० रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तिसरी घरफोडीची मोठी घटना इंदिरानगरमध्ये घडली आहे़ पाथर्डी गावातील मेट्रो झोनसमोरील सफर अपार्टमेंटमधील रहिवासी गिरीश तुकाराम उगले हे रविवारी (दि़६) सकाळी ११ ते ४ या वेळेत बाहेर गेले होते़ या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
चार घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास
By admin | Updated: March 8, 2016 00:26 IST