त्र्यंबकेश्वर : शैव पंथीय साधू-महंत मुळातच कोपिष्ट. जरा कुठे मनासारखे होत नसेल तर त्यांना सहन होत नाही अशी ख्याती असतानाही त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेली अखेरची पर्वणीही त्याच उत्साहात आणि कोणत्याही राजी नाराजीच्या सावटाशिवाय पार पडली. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या आखाड्यांच्या मिरवणुका आणि त्यांची क्रमवारी याबाबत घुसखोरी न करता शिस्तीचे पालन करीत मिरवणुका पार पडल्याने नाशिकपेक्षा त्र्यंबकेश्वरचे वेगळेपण यंदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची तत्परता हे दोन्ही गुण वाखाणण्याजोगेच होते.नाशिकमध्ये असलेल्या वैष्णव पंथीयांच्या तीन आखाड्यांमध्येही मतभेद आणि वादामुळे यंदाचा कुंभमेळा चर्चेत ठरला. दुसरीकडे त्र्यंबकेश्वरी दहा आखाडे आणि त्यांचे अनेक खालसे असतानाही त्यांनी संयमांची भूमिका घेतानाच आपसातील मतभेद चव्हाट्यावर येऊ दिले नाही. ही एक जमेची बाजू तशीच तिसरी मिरवणूकही पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. नीलपर्वतीच्या पायथ्याशी खंडेराव मंदिरासमोर आवाहन आखाड्याजवळच मिरवणुकीची सुरुवात होते. अखेरच्या पर्वणीला पिंपळद येथून जुना आखाडा वाजत गाजत येत असताना अगोदरच सज्ज झालेले ‘आवाहन’ आखाड्याचे साधू-महंत मर्दानी खेळ करून जल्लोष करीत होते, मात्र त्यांच्यावर त्यांच्यातील ज्येष्ठांचे नियंत्रण होते. प्रसंगी छडीमार देण्यासही ते मागे पुढे पाहत नव्हते. आपल्या साधू- महंतांना एकाबाजूला रांगेत बसवून ‘हर हर महादेव’ असा जयजयकार करणाऱ्या या साधूंनी कुठेही घुसखोरी केली नाही. जुना आखाडा खंडेराव मंदिराच्या पायथ्याथी दाखल झाल्यानंतर प्रथेनुसारच त्यात आवाहन आखाड्याचे साधू सहभागी झाले. अन्य सर्व आखाडेही वेळ आणि क्रमानुसारच दाखल होत गेले. त्यामुळे शैव आखाड्यांचे व्यवस्थापन कौशल्य अधोरेखित झाले.
आखाड्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची प्रचिती
By admin | Updated: September 25, 2015 22:27 IST