नशिक : जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रु ग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गोल्फ क्लब मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे १ लाख ५६ हजारांहूनअधिक रुग्णांनी विविध आजारांची तपासणी व उपचार करून घेतले. यातील सुमारे ३० हजार रुग्णांना शस्त्रक्रियेचे उपचार सुचविण्यात आले आहे. महाआरोग्य शिबिरात जिल्हाभरातील ग्रामीण भागातून सुमारे ८७ हजार रुग्णांनी उपचार घेतले. तर नाशिक व मालेगाव महापालिका भागातील ६९ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिरात तपासणी आणि उपचार करून घेण्यासाठी शनिवारी रात्रीपासून रुग्णांनी उपस्थिती लावत सकाळी ७ वाजेपासून विविध आजारांची तपासणी करून घेण्यासाठी गोळवलकर गुरुजी नोंदणी कक्षात तालुकानिहाय रांगा लावून नोंदणी क्रमांक व फाईल मिळवित तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये जिल्हाभरातील विविध तालुक्यांच्या आश्रमशाळांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह आबालवृद्धांनी हजर राहून वेगवेगळ्या आजारांची तपासणी करून घेतली. स्वयंसेवक व डॉक्टरांना सर्व सुविधा तसेच जेवण व पाण्याची जागेवर व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात आयुष, होमिओपॅथी, योगा, पंचकर्म आदि उपचारपद्धतींचाही अवलंब करण्यात आला. शिबिरात आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, शिबिराचे मुख्य समन्वयक रामेश्वर नाईक, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, वसंत गिते, सुनील बागुल, डॉ. प्रशांत पाटील, गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते. प्रत्येक तपासणी कक्षाची स्वत: पाहणी करणाऱ्या पालकमंत्र्यांची उपस्थिती शिबिरात लक्षणीय ठरली. ( प्रतिनिधी)
दीड लाख रुग्णांना लाभली आरोग्यसेवा
By admin | Updated: January 2, 2017 01:22 IST