नांदूरशिंगोटे : दोडी बुद्रूक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी माजी विद्यार्थी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिवाळी-निमित्त सैन्य दलातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. आमदार राजाभाऊ वाजे, मालेगाव येथील सैनिकमित्र डॉ. तुषार शेवाळे, शहीद संदीप ठोक यांचे वडील सोमनाथ ठोक, चित्रपट निर्माते संदीप परदेशी, उपसरपंच सुदाम वाकचौरे, विकास संस्थेचे अध्यक्ष दत्तू दराडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या २४ वर्षांपासून जिल्ह्यातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर अल्पदरात वैद्यकीय सेवा करणारे व शहीद कुटुंबावर मोफत उपचार करणारे डॉ. तुषार शेवाळे, आमदार राजाभाऊ वाजे, वीरपिता सोमनाथ ठोक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व दिवाळी भेट देऊन सैनिकांना सन्मानित करण्यात आले. प्रारंभी आमदार वाजे व डॉ. शेवाळे यांच्या हस्ते सोमनाथ ठोक यांचा सन्मान करण्यात आला. सण-उत्सवाच्या काळात सैनिक कुटुंबीयांना त्यांच्या घरातील व्यक्तींची नेहमीच आठवण येते, अशावेळी आपल्या सोबत संपूर्ण गाव असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त होत असल्याचे आमदार वाजे यावेळी म्हणाले. हा कार्यक्रम आणखी व्यापकपणे साजरा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. देशावरील संकट निवारण्यासाठी सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावत असल्याचे शेवाळे यावेळी म्हणाले. सैनिक कुटुंबीयांतर्फे चंद्रभान केदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेश शेळके, अशोक सांगळे, संजय आव्हाड, शरद उगले, दशरथ आव्हाड, अंबादास आव्हाड, शरद केदार, रघुनाथ आव्हाड, नीलेश केदार, रोहित आव्हाड उपस्थित होते. (वार्ताहर)
सैनिक कुटुंबीयांचा सन्मान
By admin | Updated: November 5, 2016 00:05 IST