नाशिक : राज्य शासनाने पुन्हा गत वर्षाप्रमाणेच गणेशोत्सवावर निर्बंध लादण्याचा घेतलेला निर्णय बहुतांश गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावर विरजण घालणारा ठरला असून, या निर्णयाने हिरमोड झाल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शासनाने कुणाशीही चर्चा, सल्ला-मसलत न करता तसेच परिस्थितीचे आकलन न करता हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाबाबत दोन महिने आधीच निर्णय घेऊन त्यावर निर्बंध घालणे पूर्णपणे अयोग्य असल्याचाच सूर बहुतांश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त करण्यात आला.
---
कोट
राज्य शासनाने निर्बंधाबाबत इतक्या लवकर निर्णय घ्यायलाच नको होता. सप्टेंबरमध्ये परिस्थिती बघून निर्णय घेतला असता तरी सर्व मंडळांनी सहकार्य केले असते. मात्र हा निर्णय फार घाईने घेण्यात आला असून, तो पूर्णपणे चुकीचा आहे.
गजानन शेलार, दंडे हनुमान मित्र मंडळ
कोट
गणेशोत्सव महामंडळांशी चर्चा न करता घेण्यात आलेला निर्णय पूर्णपणे अयोग्य आहे. हा उत्सव जनतेने साजरा करूच नये, अशीच राज्य शासनाची इच्छा दिसते. मंत्री, राजकारण्यांच्या बैठका, मेळाव्यांना निर्बंध घातले जात नाहीत. मात्र बाप्पाच्या सणाला निर्बंध घालतात हे खपवून घेण्यासारखे नाही.
रामसिंग बावरी, हिंदू एकता आंदोलन मित्र मंडळ
कोट
कोविडचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन सप्टेंबरमध्ये त्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता. अजूनही पुनर्विचार करून परिस्थिती पाहून निर्बंधात शिथिलता आणल्यास नागरिक त्या निर्णयाचे स्वागत करतील.
गणेश बर्वे, राजे छत्रपती सामाजिक मंडळ
कोट
जिल्ह्यात अन्य सर्व काही सुरू असताना केवळ गणेशोत्सवावर निर्बंध घालणे अयोग्य आहे. सर्व मंडळांनी निर्बंध पाळून नियंत्रित प्रमाणात उत्सव साजरा केला असता. गणरायाचा उत्सव हा विघ्न दूर करणाराच ठरला असता. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार होण्याची गरज आहे.
हेमंत जगताप, जिल्हा गणेशोत्सव महामंडळ