नाशिक : भयाच्या छायेने अंधारलेल्या मनामनात उत्साहाचा अंकुर प्रज्वलित करणाऱ्या गणरायाच्या आगमनाने घरोघरी भक्तिरूपी चैतन्य निर्माण केले होते. त्यामुळे दहा दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या जनमानसाकडून परंपरेप्रमाणे लाडक्या बाप्पाला रविवारी (दि. १९) जड अंत:करणाने निरोप देण्यात येणार आहे. मात्र, यंदा ‘मिशन विघ्नहर्ता’ अंतर्गत नदीपात्रात विसर्जनास मनाई करण्यात आली असून, नागरिकांनी मूर्ती दान करण्याचे किंवा शाडू मातीची मूर्ती घरच्या घरीच विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्याने नागरिकांच्या मनाला शनिवारपासूनच चुटपुट लागली आहे. रविवारी अनंत चतुर्दशीला विविध भागांतील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार असून, यासाठी महापालिकेने पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जय्यत तयारी केली आहे. शहरातील गोदावरीपात्राच्या दुतर्फा तसेच सर्व तलावांजवळ मूर्ती दान करण्याची व्यवस्था महापालिकेसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच गोदापात्राचे प्रदूषण वाढू नये, यासाठीची दक्षता घेण्यात येत आहे.
इन्फो
निर्माल्यासाठी कलशव्यवस्था
निसर्गप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी निर्माल्य जमा करण्यासाठी उभे राहणार आहेत. तलाव आणि विहिरीत निर्माल्य न टाकता घरी किंवा परिसरातील मोकळ्या जागेत खड्डा करून त्यात टाकावे. तसेच विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचा वापर करण्याचेही आवाहन मनपा आणि पर्यावरणप्रेमी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिकच्या प्रारब्ध या संस्थेच्या वतीनेदेखील रामकुंड, घारपुरे घाट आणि जवळपासच्या परिसरात कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे.
इन्फो
फिरत्या तलावांची सुविधा
नदीकाठी विसर्जनस्थळावर मनपाच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच काही ऑन व्हील तलाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या निवासी क्षेत्रात मागणीनुसार विसर्जनासाठी फिरते विसर्जन टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन किंवा घरच्या घरीच बादलीत किंवा मोठ्या टबामध्ये मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले आहे.