२२ जानेवारी २०१६ रोजी पूनम ऊर्फ रुपाली विशाल महाजन हिने आत्महत्या केली होती.
पूनम हिने घर व गाळा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, तसेच तिला दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून पती व सासू सासरे तिचा छळ करत होते. न्यायालयाने तिचा पती विशाल खंडू महाजन (३१), कमळाबाई खंडू महाजन (६०), खंडू भादू महाजन (६६, सर्व रा. दसक, जेलरोड) यांना दोषी धरले.
विशालसह सासू सासरे छळ करीत होते. तिघांनी संगनमत करून पूनमला शिवीगाळ, मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून पूनम ऊर्फ रुपाली हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पूनमला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. ए. सदाफुले यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून आर. एम. कोतवाल यांनी कामकाज पाहिले. त्यात आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. यात पूनमचा पती विशाल यास १० वर्षे सश्रम कारावास व ५,००० रुपयांचा दंड, तर पूनमच्या सासू व सासऱ्यास ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ५,००० रु. दंड ठोठावला आहे. तसेच पूनमचा छळ केल्याप्रकरणी तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.