नाशिक : मौजे गोवर्धन येथील सार्वजनिक सरकारी जागा ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे गावातील खासगी व्यक्तीच्या नावावर करून दिल्याचा आरोप लता जाधव व शैला जाधव यांनी केला आहे. याबाबत काही कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराला गटविकास अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्यानेच वारंवार तक्रारी करूनही याबाबत कारवाई करीत नसल्याचे म्हटले आहे. मौजे गोवर्धन येथील सार्वजनिक सरकारी जमीन ग्रामपंचायतीने गावातीलच बाळू बंडू जाधव यांच्या नावावर केली आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रणधीर सोमवंशी यांच्याकडे निवेदन दिले असता त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना १५ डिसेंबर २०१४ व ५ जानेवारी २०१५ रोजी पत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले असूनही, पंचायत समितीमार्फत याप्रकरणी काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही या बाबतीत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शैला जाधव व लता जाधव यांनी केला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत काही कारवाई न झाल्यास नाशिक तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शैला जाधव व लता जाधव यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)
सरकारी जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप गोवर्धन येथील प्रकार
By admin | Updated: March 6, 2015 00:15 IST