शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोदावरीत खळाळला ‘भक्तीचा प्रवाहो’

By admin | Updated: September 13, 2015 23:18 IST

महाकुंभपर्वणी : लक्षावधी भाविकांचे पुण्यस्नान, आखाड्यांच्या मिरवणुकीची ‘शाही’ अनुभूती

नाशिक : ‘गंगा गोदावरी महाभागे, महापापविनाशिनी’...पापांचा नाश करणारी गोदावरी मोक्षाचे सुलभ साधन मानली गेली आहे आणि हाच श्रद्धाभाव मनी साठवत सिंहस्थ कुंभमेळ्यातील श्रावणी अमावास्येला आलेला महापर्वकाळ साधत भरतभूवरील विविध प्रांतांसह सातासमुद्रापलीकडून आलेल्या लाखो भाविकांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरी गोदास्नानाचा विलक्षण धर्मसोहळा अनुभवला. आत्मशुद्धी व आत्मकल्याणाची अनुभूती देणारा आणि धर्मरक्षणाची द्वाही त्रिखंडात फिरवणारा कुंभपर्वाचा मंगलसोहळा विविध आखाडे व खालशांच्या ‘शाही’ मिरवणुकीने तर आणखीच शुभंकर झाला. महापर्वणी निर्विघ्न पार पडल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. शनिवारी पिठोरी अमावास्येला लक्षावधी भाविकांनी गोदाघाटावर स्नानासाठी गर्दी केल्याने आणि पावसानेही धुवाधार हजेरी लावल्यानंतर पर्जन्यसंकट असलेल्या महापर्वणीला भाविकांची संख्या घटण्याचा अंदाज श्रद्धाळू भाविकांनीच फोल ठरविला. शनिवारी मध्यरात्रीपासूनच रामकुंड व कुशावर्त तीर्थाकडे आगेकूच करणाऱ्या भाविकांच्या गर्दीने रस्ते ओसंडून वाहत होते. गोदातटी लोटलेला हा आस्थेचा महापूर अनेकांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त तर झालाच शिवाय नाशिककरांनीही तो काळजात साठविला. भाविकांचा ओघ सुरू असतानाच नाशकात तपोवनातील साधुग्राममध्ये सकाळी ६ वाजेच्या सुमारास साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. द्वितीय शाहीस्नानासाठी निर्मोही आखाड्याला अग्रभागी मान होता. त्यानंतर मधोमध दिगंबर अनी आखाडा आणि सर्वात शेवटी निर्वाणी अनी आखाडा सहभागी झाला होता. फुलामाळांनी सजविलेल्या वाहनांतून निघालेल्या या मिरवणुकीतून शाहीमार्गावर दुतर्फा जमलेल्या भाविकांनी महात्म्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.४५ वाजता निर्मोही आखाड्याचे रामकुंडावर आगमन झाले. यावेळी धर्मध्वज व निशाण तसेच इष्टदेवता पवनपुत्र हनुमानाची पूजा करत आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास, महंत अयोध्यादास महाराज तसेच षष्ठयपीठाचे वल्लभाचार्य स्वामी वल्लभराय यांनी गोदास्नान केले. ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘पवनपुत्र हनुमानकी जय’ या नामघोषात आणि ढोल-नगाऱ्यांच्या गजरात आखाड्यांबरोबर त्यांच्यासमवेत असलेल्या खालशांतील साधूंनी गोदास्नान करत महापर्वणीचा पुण्यकाळ साधला. निर्मोहीनंतर दिगंबर अनी आखाड्याचे सकाळी ८.४५ वाजता रामकुंडावर आगमन झाले. यावेळी विधीवत पूजा झाल्यानंतर आखाड्याचे श्रीमहंत कृष्णदास महाराज, चतु:संप्रदायाचे महंत बर्फाणीदादाजी महाराज, महंत रामकिशोरशास्त्री महाराज, डाकोर इंदोर खालशाचे गाद्याचार्य माधवाचार्य महाराज, महंत भक्तिचरणदास यांनी गोदास्नान केले. नंग्या तलवारी उंचावत आणि जटांचे प्रदर्शन करत साधूंनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी दुग्धाभिषेक करत गोदामाईला नमन करण्यात आले. सर्वात शेवटी ९.२० वाजता निर्वाणी अनी आखाडा रामकुंडावर आल्यानंतर आखाड्याचे श्रीमहंत ग्यानदास महाराज यांनी भाविकांना हात उंचावून अभिवादन केले आणि गोदास्नानाचा पुण्यकाळ साधला. त्यांच्यासमवेत निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धरमदास महाराज, चतु:संप्रदायाचे फुलडोलदास बिहारी, खाकी आखाड्याचे महंत जगन्नाथदास महाराज, निम्बार्कचार्य श्री जी महाराज आदिंनी गोदास्नान केले. तीनही आखाडे आपापले स्नान करत परतीच्या मार्गाने साधुग्रामकडे मार्गस्थ झाले. तीनही आखाड्यांच्या इष्टदेवता पूजाविधीचे पौरोहित्य दिनेश गायधनी, विनायक गायधनी, गजानन गायधनी आदि ब्रह्मवृंदांनी केले. दुपारी १२ वाजेपर्यंत विविध खालशांतील साधू-महंत यांचे गोदास्नान सुरु होते. त्यानंतर प्रशासनाने गर्दीचा अंदाज लक्षात घेत भाविकांना स्नानासाठी रामकुंड खुला केला. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरीही शैव पंथीयांच्या दहाही आखाड्यांने नियोजित क्रमवारीनुसार कुशावर्त तीर्थावर गोदास्नान केले. त्र्यंबकेश्वर येथे पहाटे ३ वाजता आखाड्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत नागा साधूंचे शिस्तबद्ध संचलन भाविकांचे आकर्षण ठरले. पहाटे ४ वाजता सर्वप्रथम पंचायती श्री निरंजनी आखाड्यातील साधू-महंतांनी स्नान केले, तर सर्वात शेवटी सकाळी १० वाजता श्री निर्मल पंचायती आखाड्याने गोदास्नान केले. त्यानंतर कुशावर्त भाविकांना खुले करुन देण्यात आले. पहिल्या पर्वणीला (दि. २९ आॅगस्ट) पोलीस प्रशासनाच्या अतिरेकी बंदोबस्ताचा परिणाम भाविकांची संख्या घटण्यात झाला होता. प्रशासनाच्या या नियोजनावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर पोलिसांनी फेरनियोजन करत महापर्वणीला बंदोबस्ताचा विळखा सैल केला होता. त्यामुळे भाविकांना विनासायास गोदाघाटाकडे मार्गक्रमण करता आले. याशिवाय शहरांतर्गत बस व रिक्षा यांच्या माध्यमातून वाहतूक सेवाही कार्यरत ठेवल्याने भाविकांची पायपीट कमी झाली. साधू-महंतांच्या स्नानाबरोबरच लाखो भाविकांनी रामघाटावर हजेरी लावत गोदास्नानाची महापर्वणी साधली. वरुणराजाला साकडेराज्याचे जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी तीनही आखाड्यांच्या साधू-महंतांचे स्नान होत असताना रामकुंडावरच ठाण मांडत प्रसंगी पाण्यात उतरत स्वत: गर्दी नियंत्रण करण्याचीही भूमिका बजावली. आखाड्यांचे स्नान आटोपल्यानंतर पालकमंत्र्यांनी सपत्नीक गोदास्नान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सांगितले, राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे मी गोदामाईकडे वरुणराजाला खूप बरसण्याचे साकडे घातले आहे. पहिल्या पर्वणीला आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या दुरुस्त करत फेरनियोजन करण्यात आले आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघता मी पूर्ण समाधानी आहे. नाशिक व त्र्यंबक मिळून सुमारे ६० लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा दावाही महाजन यांनी केला.