नाशिक : महाआरोग्य शिबिर म्हणजे हा विविध रुग्णांचा दिवस असून, या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी योगदान देणारे स्वयंसेवक भविष्यात समाजसेवक म्हणून समाजाची सेवा करणार असल्याने या आरोग्याच्या महाकुंभातून भविष्यातील थोर समाजसेवकांची पिढी घडेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, चंदूभय्या पटेल, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, डॉ. सुलतान प्रधान, रिलायन्स फाउंडेशनचे गुस्ताद डावर, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, सोमेश्वरानंद सरस्वती, श्रीनाथजी महाराज आदि उपस्थित होते. महाजन म्हणाले, राज्यात विविध ठिकाणी झालेल्या महाशिबिरांपेक्षा नाशिकच्या महाशिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक रुग्णांना सेवा देण्याची संधी मिळणे हेच शिबिराचे यश आहे. शिबिर कोणत्याही पक्षाचे नसल्याने येथे सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थांनी तसेच उद्योजकांनीही शिबिरासाठी मदत केल्याचे महाजन म्हणाले. विविध शाळा, महाविद्यालयांनी सुमारे पाचशेहून अधिक बसेसची व्यवस्था केली होती. सुमारे सहा ते साडेसहा कोटी रुपयांची औषधे सात ट्रक्समधून उपलब्ध करून देण्यात आली होती.प्रास्ताविक रामेश्वर नाईक यांनी केले. सूत्रसंचालन योगेश कमोद यांनी केले. (प्रतिनिधी)
समाजसेवकांची पिढी घडेल
By admin | Updated: January 2, 2017 01:07 IST