धनंजय वाखारे नाशिकअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत मोठ्या ‘कौतुका’ने सुरू केलेला विश्व साहित्य संमेलनाचा प्रपंच गेल्या सहा वर्षांपासून थांबला असताना कोणत्याही सरकारी अनुदानाविना साहित्य रसिकांच्याच पुंजीतून मायमराठीची विश्वपरिक्रमा नाशिकचे गायकवाड बंधू गेल्या पाच वर्षांपासून अखंडपणे करत आले आहेत. साहित्य संमेलनाला एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त न करता नव्या वाटा चोखाळत यंदा सहाव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा मांडव येत्या २२ व २३ सप्टेंबरला भूतानची राजधानी थिम्पू याठिकाणी पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या भूमीत वाढलेल्या प्रमोद आणि नीलेश गायकवाड या बंधूंनी मराठी भाषेचा झेंडा अटकेपार नेण्याचा पराक्रम गाजवला आहे. एका सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलांनी घडविलेली मायमराठीची विश्वसेवा अचंबित करणारी आणि अनुकरणीय अशीच आहे. ‘मराठी भाषेचे आभाळ जेवढे मोठे तेवढीच खोलीदेखील अधिक’ या विचाराने प्रभावित झालेल्या गायकवाड बंधूंनी आपल्या व्यवसायाची सूत्रे सांभाळतानाच मातृभाषा ‘मराठी’ला जगभरात नेऊन पोहोचविण्याचा संकल्प सोडला आणि म्हणता म्हणता गेल्या पाच वर्षांत अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि मॉरिशस याठिकाणी मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करत सरकारी अनुदानावर आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून फुकटात परदेशवारी करणाऱ्या साहित्य महामंडळाला सणसणीत चपराक लगावलेली आहे. निनाद बेडेकर, विनय सहस्त्रबुद्धे, विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी आदिंनी या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. सुरुवातीला शिवसंघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परदेशात मराठी भाषेचा यज्ञ धगधगत ठेवणाऱ्या गायकवाड बंधूंनी आता विश्व मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या बदलाचे वारे ओळखून आपली शिडे उभारण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या गायकवाड बंधूंनी संमेलन हे फक्त मराठी साहित्य या पुरताच मर्यादित न राहता ते क्रीडा, आरोग्य, व्यावसायिक आदि क्षेत्रांनाही स्पर्श करणारे असेल, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच भूतानमध्ये भरणाऱ्या संमेलनात ‘माध्यम’ हा विषय निवडण्यात आला असून, नव्या माध्यमांसह प्रस्थापित माध्यमांच्या संदर्भात चिंतन होणार आहे. परदेशात साहित्य संमेलने भरविणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे, याची अनुभूती अखिल भारतीय साहित्य महामंडळालाही आली आहे. कौतिकराव ठाले पाटलांनी मांडलेला हा प्रपंच आता थांबलेला आहे. परंतु गायकवाड बंधूंकडे फार मोठे मनुष्यबळ नसतानाही मायमराठीचा विश्वयज्ञ गेल्या पाच वर्षांपासून विदेशी भूमीवर धगधगतो आहे. अर्थातच या विश्वसाहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा आधार लाभला आहे. प्रत्येक संमेलनाला पदरमोड करून हजेरी लावणारे भारतीय रसिक पुढच्या संमेलनासाठी आपली नोंदणी आगाऊ करून ठेवतात, हेच या संमेलनाच्या यशस्वीतेचे खरे गमक आहे.
गायकवाड बंधूंची मायमराठीची विश्वपरिक्रमा
By admin | Updated: September 11, 2016 01:35 IST