नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७२ पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया सुरू असून, या नोकरभरतीसाठी उमेदवारांकडून नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी केल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, नोकरभरतीच्या नावाखाली अशी आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार सुरू असल्याचे कळताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने उमेदवारांनी नोकरभरती ही पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्याने कोणीही आर्थिक आमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केल्याने या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.नाशिक जिल्हा परिषदेमधील गट क व ड च्या पदासाठी २०१५ मध्ये सरळसेवेने भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. पदभरती प्रक्रिया ही आॅनलाइन पद्धतीने संगणकीय यंत्रणेद्वारे अर्ज मागवून विहित पद्धतीने करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने आदेशित केल्याप्रमाणे विहित पध्दतीने विहित कालावधीत शासन नियम व अटीनुसार राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पैसे मागणी करून नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांकडे आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना ठरावीक कोटा ठरवून दिला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नाहक जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. ही भरती पारदर्शक व पात्र उमेदवारांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या गुणवत्तेवर होणार आहे. त्यामुळे कथित पैशाची मागणी करणाऱ्यांकडून उमेदवारांनी सावध राहावे व आपली फसवणूक टाळावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
भरतीआधीच आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी
By admin | Updated: November 21, 2015 00:22 IST