नाशिक : सर्वच पक्षांकडून सोयीच्या मानल्या गेलेल्या मध्य नाशिक मतदारसंघात शुक्रवारी चार इच्छुकांचे अर्ज दाखल झाले. मनसेचे आमदार वसंत गिते आणि कॉँग्रेस उमेदवार शाहू खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तथापि, अन्य पक्षांमध्ये उमेदवारीचा घोळ कायम आहे. शनिवारी अंतिम दिवशी सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेल्या शनिवारपासून सुरुवात झाली. त्यानंतर गुरुवारपर्यंत फार मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले नव्हते. गुरुवारी पाच इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मनसेचे उमेदवार आमदार वसंत गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर यतिन वाघ, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक आदि उपस्थित होते. कॉँग्रेस उमेदवार शाहू खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तथा शहराध्यक्ष अजय बोरस्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची उमेदवारी मात्र घोषित झालेली नव्हती. त्याचप्रमाणे सचिन काठे या अपक्ष उमेदवारानेही अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी तसेच भाजपाचे उमेदवार अद्याप निश्चित नसल्याने या पक्षाकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. या पक्षाचे उमेदवार शनिवारी (दि. २७) उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मध्यमधून चार अर्ज दाखल
By admin | Updated: September 27, 2014 00:58 IST