नाशिक : जिल्हा परिषदेच्या आगामी पाच एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समिती निवडणुकीबाबत राजकीय हालचालींनी वेग घेतला असून, भाजपाने केलेल्या चमत्काराची भाषा आणि सेनेपुढे दोन अपक्षांनी केलेला पदासाठीचा अट्टाहास यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याच्या उपकक्षात (अॅन्टीचेंबर) कॉँग्रेसचे दोन माजी आमदार व शिवसेनेच्या एका माजी आमदाराने आगामी निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे समजते. तर कॉँग्रेसने आणखी एका विषय समितीवर दावा केला असून, शिवसेनेने सभापती न दिल्यास कॉँग्रेसच्या आठपैकी पाच सदस्यांनी भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीकडे कूच केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मुंबईला न्यायालयाच्या तारखेदरम्यान भाजपाचे आमदार अपूर्व हिरे यांनी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना भाजपासोबतच राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या निवडून आलेल्या २५ व एक अपक्ष सदस्यांनी सर्वाधिक संख्याबळ निवडून येऊन केवळ अध्यक्ष पदावर समाधान मानायचे काय? चारपैकी एखादी समिती घेण्यापेक्षा राष्ट्रवादीला सोबतीला घेऊन दोन समित्या पदरात पाडून जास्तीत जास्त सदस्यांना सभापतिपदाची संधी द्या, असा मतप्रवाह सेनेच्या काही मावळ्यांमधून उमटू लागल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडीत कॉँग्रेसचे दोन माजी आमदार अॅड. अनिलकुमार अहेर व रामदास चारोस्कर यांनी त्यांच्या भाजपाच्या मित्रपरिवारासोबत केलेल्या चर्चेचे वृत्तही जिल्हा परिषदेच्या वर्तुळात अन्य पक्षांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या भूमिककडे आता भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीसह शिवसेनेचेही लक्ष लागून असल्याचे चित्र आहे. मुंबईला शिवसेना व माकपाच्या नेत्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसच्या भूमिकेकडे ‘लक्ष’
By admin | Updated: March 30, 2017 00:53 IST