सटाणा : विहिरीत आडवे बोअरवेल सुरू असताना पाइपमध्ये स्वेटर अडकल्याने काही कळण्याच्या आत शरीराचा चेंदामेंदा होऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे बुधवारी पहाटे ४ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. प्रकाश बाळासाहेब शेलार (४०) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.सटाणा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनी शेमळी येथील वसंत बागुल यांच्या विहिरीवर आडवे बोअरवेल करण्याचे काम आज पहाटे सुरू होते. दुष्काळी स्थितीमुळे गावातीलच शेतकरी प्रकाश शेलार बोअरवेलवर रोजंदारीने कामाला होता. पहाटे सुरू असलेल्या आडव्या बोअरवेलचे पाइप जोडण्यासाठी शेलार विहिरीत होता, तर त्याचा दुसरा साथीदार विहिरीवर मशीन आॅपरेट करीत होता. एक पाइप संपूर्ण जमिनीत गेल्याने दुसरा पाइप जोडण्याचे काम करत असतानाच प्रकाशच्या अंगातील स्वेटर दोन्ही पाइपांमध्ये अडकून पडल्याने त्याला काही समजण्याच्या आत स्वेटरसह तो स्वत: अतिवेगात पाइपमध्ये अडकून गेल्याने त्याचा एक हात काही क्षणात कापला गेला व त्यानंतर निम्म्याहून अधिक शरीराचा भाग फिरत असलेल्या पाइपमध्ये अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पी.टी. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेची सटाणा पोलिसांत नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. (वार्ताहर)
बोअरवेलमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Updated: April 6, 2016 22:37 IST