नाशिक : जिल्ह्यातील मतिमंद, गतिमंद असलेल्या विशेष बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या प्रबोधिनी विद्यामंदिराच्या वतीने दरवर्षी विशेष राख्यांची निर्मिती केली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे विद्यार्थीच शाळेत येऊ शकले नसल्याने यंदा केवळ होस्टेलमध्ये निवासी असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अत्यल्प प्रमाणात राख्या बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘कोरोना’चे सावट यंदा या विशेष राख्यांवरदेखील पडले आहे.
मानसिक अपंग मुलांनाही इतरांप्रमाणे आनंदाने जगण्याचा, आरोग्य, शिक्षण व व्यवसायाचा हक्क मिळावा, यासाठी रजनीताई लिमये यांनी मानसिक विकलांगांसाठी नाशिकमध्ये १९७७ पहिली शाळा काढली. या मुलांना समाजात वावरता यावे याकरिता त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना विशेष शिक्षण द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन साडेचार दशकांपूर्वी शहरातील चार ‘विशेष’ बालके गोळा करून दोन खोल्यांच्या जागेत सुरू झालेल्या या संस्थेच्या कार्याचा विस्तार रजनीताईंनी तीन शाळांपर्यंत वाढविला. या शाळेत मानसिक अपंग मुलांच्या बुद्ध्य़ांकानुसार गट पाडून त्यांना शिक्षण दिले जाते. प्रत्येकाला सुलभ शारीरिक हालचाली, स्वावलंबन, सामाजिक जाण, संपर्क कौशल्य विकसित करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातात. मुलांची वर्तनसमस्या कमी करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोरंजनाची साधने, हस्तव्यवसाय शिक्षण आदी उपक्रमांनी त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रौढ गतिमंदांना प्रत्येकाची मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा पार पाडते. कार्यशाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांना फाइल व द्रोणनिर्मिती, कापडी पिशव्या व खुर्च्यावरील कापडी आच्छादन शिलाई, स्क्रीन प्रिंटिंग, मसाला व पूजा साहित्य पिशवीबंद करणे, आकाश कंदील व छोट्या गुढींची निर्मिती, पापड बनविणे, बाइंडिंग आदी कामांत पारंगत करण्यात आले आहे. या कामातून होणाऱ्या उत्पन्नातून संस्था संबंधितांना दर तीन महिन्यांला काही मानधनही देते. काही जणांनी द्रोणनिर्मितीची यंत्रणा खरेदी करून घरातच आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. प्रबोधिनीत येऊन काम करायला शिकलेली अनेक मुले बाहेर काम करून अर्थार्जन करू लागले आहेत.
इन्फो
यंदा राख्या केवळ हितचिंतकांना
यंदा केवळ होस्टेलमध्ये असलेल्या २५ विद्यार्थ्यांनी मोजक्याच राख्या बनविल्या आहेत. त्या केवळ संस्थेचे हितचिंतक, देणगीदार यांना पाठविण्यात येणार आहेत. शाळा पूर्ववत सुरु झाल्यानंतरच पुढील वर्षापासून अधिक प्रमाणात राखीनिर्मिती शक्य होऊ शकेल.
रमेश वनिस, मुख्याध्यापक, प्रबोधिनी विद्यामंदिर