येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात ग्रामपंचायत प्रशासन, कोविड समिती, व्यापारी संघटना, विविध संस्थेचे पदाधिकारी, गावातील प्रमुख मंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात बैठक होऊन त्यात आठ दिवस गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दि. ८ मे रोजी सकाळी ११ पासून ते १६ मे रोजी रात्री १२ पर्यंत गावातील सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. यात वैद्यकीय सेवा, मेडिकल पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. तर दूध संकलन व विक्री सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहणार आहेत. गावातील किराणा दुकान, भाजीपाल्यासह खासगी आस्थापना आठ दिवस पूर्णतः बंद राहणार आहेत. खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले यांना गावात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
विलगीकरण कक्षाचे नियोजन
नांदूरशिंगोटेत एकाच कुटुंबातील तिघे तर दुसऱ्या कुटुंबातील दोघेजण मृत्यूमुखी पडल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत मागणी केली. तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच राजकीय नेत्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.