नाशिक : यावर्षी गहू, तांदूळ व डाळींचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून, नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर काहीअंशी कमी झाले असल्याने नाशिककरांनी संपूर्ण वर्षासाठी अन्नधान्य साठवण्याचे नियोजन सुरू केले आहे. यंदा पीक उत्पादन वाढल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नसल्याने केंद्र सरकारने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे येत्या काळात गव्हासह डाळींच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक वर्षभरासाठी आवश्यक असलेले गहू, तांदूळ, डाळी साठविण्याचे नियोजन करीत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यांच्या कालावधीत डाळींचे भाव गगनाला भिडले होते. तूर डाळ तर दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे यंदा खबरदारीचा पर्याय म्हणून अनेकजण वर्षभरासाठी डाळींच्या किमती कमी असल्याने त्या साठवून ठेण्याच्या पवित्र्यात आहेत. उन्हाळ्यात वडे, पापडा यांसारखे वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी हरभरा डाळ व उडीद डाळीचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शेवया, कुरडयांसाठी विशेष गव्हाची ग्राहकांकडून खरेदी होत आहे. तर वर्षाच्या गरजेसाठी शरबती आणि लोकवण गव्हाला नागरिकांची अधिक पसंती आहे. अनेकजण महाराष्ट्रातच उत्पादित होणारा अजित १०२ व मोहन वंडर गव्हाची खरेदी करीत आहे. यंत्राद्वारे कापणी करून काढलेल्या व चाळण के लेल्या गव्हाला नाशिककरांची अधिक मागणी असल्याचे दुकानदार सांगतात. (प्रतिनिधी)नाशिकमध्ये जिल्ह्यातून इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वरसह विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदीया या भागातून तांदूळ येतो. सोबतच मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथूनही येणाऱ्या तांदळालाही चांगली मागणी आहे. पारंपरिक कोळपी तांदळाला चांगली मागणी असून, इंद्रायणीलाही चांगला ग्राहक आहे. यावर्षी गहू आणि तांदूळ यांच्या भावामध्ये फारसा चढ- उतार झालेला नाही.- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना, नाशिकनाशिकमध्ये मध्य प्रदेशमधून गहू येतो. यात शरबती गव्हासह लोकवण गव्हाला चांगली मागणी आहे. महाराष्ट्रात उत्पादित होणारा अजित १०२ व मोहन वंडर गव्हाला मागणी आहे. ग्राहक यंत्राने काढलेला गहू खरेदी करण्याला पसंती देतात. त्यासाठी दर वाढवून देण्याचीही ग्राहकांची तयारी असते. असा गहू साधारण गव्हापेक्षा ५० ते १०० रुपये महाग आहे. यावर्षी अन्नधान्याचे दर स्थिर असले तरी सरकारने १० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मार्च अखेरमुळे व्यवहारही मंदावलेले असल्याने खरेदी-विक्री आणि महागाईविषयीचे चित्र स्पष्ट होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. - अशिष पगारिया, व्यापारी, नाशिक
आयात शुल्कामुळे गहू, डाळींचे दर वाढण्याचे संकेत
By admin | Updated: March 30, 2017 00:42 IST