पंचवटी : मित्रांसमवेत चामारलेणीजवळील छोट्या पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहापैकी दोघा मित्रांंचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि.२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. पाण्यात बुडून मृत्यू झालेले दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून, ते दिंडोरी रोडवरील कलानगर येथील रहिवासी आहेत. परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अथर्व बिहान्त कुलकर्णी (१८) व रोहित कोलते (दोघे राहणार आकाश पेट्रोलपंपासमोर) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, म्हसरूळ परिसरातील कलानगर भागात राहणारे अथर्व बिहान्त कुलकर्णी (१८), रोहित कोलते (१६), सागर राजू निकम (१७), अभिनय संजय सावंत (१६), ओम संजय पाटील (१६), ओमकार बिहान्त कुलकर्णी (१६) असे सहा मित्र काल सायंकाळच्या सुमाराला म्हसरूळ चामारलेणीजवळील पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. अभिनय वगळता पाच जणांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्याचा व चिखलाचा अंदाज न आल्याने सर्वजण गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडू लागले. त्यात सागर निकम, अभिनय सावंत, ओमकार कुलकर्णी हे कसेबसे पाण्याच्या बाहेर निघाले तर अथर्व कुलकर्णी व रोहित कोलते हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा पाण्यात उड्या घेत अर्धा तास शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडत नसल्याचे परिसरात फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना सांगितले. त्यानंतर काहींनी पोलिसांना व भाजपाच्या विजय मोहिते यांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी पाण्यात उड्या मारून यातील एकाला मृतावस्थेत पाण्याबाहेर काढले. या घटनेतील मयत अथर्व हा क.का. वाघ महाविद्यालयात १२वी विज्ञान शाखेच्या वर्गातील विद्यार्थी असून, त्याच्या पश्चात फक्त आई आहे, तर रोहित हा महावीर कॉलेजला डिप्लोमा करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शोककळा पसरली असून, दोघांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
पंचवटीत दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: September 4, 2016 01:24 IST