वडांगळी : सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवात दुर्घटना घडू नये, यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी ‘फायर बॉटल’ संच दुकानात ठेवावे. ग्रामपंचायतीने त्याशिवाय दुकानांना परवानगी देऊ नये, अशा सूचना प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील यांनी केल्या. येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सव नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सरपंच सुनीता सैंद, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, उपसरपंच नानासाहेब खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, सतीमाता-सामतदादा संस्थानचे उपाध्यक्ष रमेश खुळे, देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. एस. डी. वाणी, कडवा कालवा विभागाचे उपविभागीय अधिकारी व्ही. एम. बच्छाव, सहायक कार्यकारी अभियंता एस. टी. गायधनी, सिन्नरचे आगार व्यवस्थापक के. पी. सांगळे, वडांगळी वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मंगेश खर्जे, ग्रामसेवक शेषराव धीवर, वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष विनायक घुमरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. एम. तांबे आदि उपस्थित होते. यात्रा पटांगणात थाटल्या जाणाऱ्या दुकानांच्या रांगेत १५ फूट अंतर असावे, उपहारगृह थाटताना दुकानात आग विरहित बाबींचा जास्तीत जास्त वापर करावा. शेगडी असलेल्या ठिकाणी छत व भोवताली पत्र्यांचा वापर करण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी केल्या. सर्व विभागांशी समन्वय साधता यावा, याकरिता सर्व विभागांचे एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी यात्राकाळात उपलब्ध ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. यात्राकाळात भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणी भाविकांना सूचना करण्यासाठी ध्वतनक्षेपक बसविण्यात यावे, भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी स्टॅण्ड पोस्टची व्यवस्था करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनास पाटील यांनी दिल्या. ग्रामस्थांनी फिरत्या शौचालयाची मागणी केली असता जिल्ह्यात फिरते शौचालय उपलब्ध नसल्याने संस्थानने तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याचे आदेश पाटील यांनी यावेळी दिले. कडवा कालव्यास आवर्तन सोडून त्यातील पाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या तळ्यात सोडण्यात यावे व मंदिराच्या पाठीमागील उपवितरिकेस पाणी सोडण्यास ते पाणी भाविकांना वापरासाठी येऊन अंघोळीची व्यवस्था होईल, असा प्रस्ताव ग्रामस्थांनी यावेळी मांडला. गेल्या वर्षी पुरेसा पाणीसाठा नसल्याने आवर्तन देण्यात आले नव्हते. यावेळी सदर आवर्तनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यात्रा परिसरात जीवन प्राधिकरणाच्या वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे तळे आहे. सदर तळ्यास संरक्षण कुंपण नसल्याने तेथे बंदोबस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. (वार्ताहर)
फायर बॉटलशिवाय हॉटेल व्यावसायिकांना परवानगी देऊ नये
By admin | Updated: February 5, 2017 00:26 IST