नाशिक : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्णात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचन, उद्योगाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, परतीच्या पाऊसही गेल्या तीन दिवसांपासून कमी, अधिक प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्णात यंदा उशिराने म्हणजेच जुलैच्या अखेरच्या टप्प्यात व आॅगस्टच्या प्रारंभी मान्सूनचे आगमन झाले, परंतु ते दमदार होते. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्णाला झोडपून काढले, एवढेच नव्हे तर नद्या, नाल्यांना पूर येऊन जीवित व वित्तहानीही सोसावी लागली; मात्र या पावसाने शेतकरी सुखावला, जिल्ह्णात ९० टक्क्याहून अधिक खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर जवळपास दीड महिना पावसाने दडी मारली. असे असले तरी, जिल्ह्णाची पावसाची वार्षिक सरासरी १६११७ मिलीमीटर इतकी असून, गेल्या वर्षी त्यापैकी ९७९८ मिलीमीटर इतकाच म्हणजेच एकूण सरासरीच्या ६० टक्के इतकाच पाऊस झाला होता. परिणामी खरीप हंगाम हातचा जाऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र आॅगस्टमध्येच धुवाधार पाऊस कोसळून सारी भरपाई काढून टाकली. वर्षाकाठी तालुक्यांमध्ये पडणाऱ्या पावसापेक्षा यंदा इगतपुरीत १४४ टक्के, दिंडोरी-१२१, बागलाण-११७, निफाड-१०३, सिन्नर-११७ टक्केपाऊस झाला आहे. आजवर १४९३६ मिलीमीटर पाऊस म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून लावलेल्या हजेरीमुळे पाण्याची वाट पाहणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले, त्याचबरोबर नदी, नाल्याच्या साठ्यात वाढ झाली, शिवाय विहिरींनाही त्याचा फायदा झाला आहे. अजून काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचा व्यक्त होत असलेला अंदाज पाहता, रब्बी हंगामासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. (प्रतिनिधी)हवामान खात्याचा इशारापरतीच्या पावसाचे अनुकूल वातावरण सर्वत्र तयार झाल्याने हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बुधवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. आगामी ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊन नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा ९३ टक्के पाऊस
By admin | Updated: September 22, 2016 01:06 IST