नाशिक : नजीकच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याची शक्यता असून, तत्पूर्वीच मंजूर विकासकामे तातडीने सुरू करा नंतर मात्र कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, अशी तंबी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीचे वातावरण पाहता, जेमतेम एक महिन्याचा कालावधी हाती शिल्लक आहेत, त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघात कामे सुरू झाली पाहिजेत, असे सांगून भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक खात्याच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्याची सूचना केली. आमदार शिरीष कोतवाल व अनिल कदम यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी पुन्हा एकदा बैठक घेऊन काय कामे सुरू झाली याचा आढावा घेतला जावा, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री भुजबळ यांनी दोन आठवड्यांत पुन्हा बैठक घेण्याचे जाहीर केले, त्याचप्रमाणे प्रशासकीय मान्यतेसाठी जी कामे योग्य असतील ती तत्काळ मंजूर करून त्याची पुढची प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, आमदार ए. टी. पवार, जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्यासह आमदार निर्मला गावित, जयंत जाधव, माणिक कोकाटे, संपत सकाळे, मोठाभाऊ भामरे, ज्योती माळी आदि उपस्थित होते.
विकासकामांना आचारसंहितेचा बाऊ नको
By admin | Updated: July 19, 2014 20:36 IST