नाशिक : महापालिकेची उद्याने ही उत्पन्नाचे स्त्रोतही बनली पाहिजे. त्यामुळे पडीत असलेली उद्याने खासगीकरणातून विकसित करा, भलेही त्यासाठी तिकिटे लावण्याची वेळ आली तरी चालेल, अशी भूमिका महापौर रंजना भानसी यांनी घेतली असून, तशा सूचनाच त्यांनी उद्यान विभागाच्या आढावा बैठकीत उद्यान अधीक्षकांना दिल्या.महापौर रंजना भानसी यांनी उद्यान विभागाचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर उपस्थित होते. यावेळी उद्यान विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे बी. यू. मोरे यांनी उद्यानांच्या स्थितीची माहिती दिली. शहरात एकूण ४८१ उद्याने असून, त्यापैकी १९१ उद्यानांची देखभाल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत तर २९० उद्यानांची देखभाल ठेकेदारांमार्फत केली जाते. नेहरू वनोद्यानात टाटा ट्रस्टमार्फत साकारलेल्या बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून आतापर्यंत १६ लाखांचा महसूल मिळाल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले. त्यावर महापौरांनी शहरातील पडीत उद्याने ही खासगी विकसकांना देण्याची सूचना केली व त्याबाबत सर्वेक्षण करण्याचेही आदेशित केले. सध्या उन्हाळ्यामुळे अनेक उद्यानांतील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात उद्यानातील झाडे व दुभाजकांतील झाडे जगविण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा अथवा गरज भासल्यास विंधन विहीर खोदण्याचेही महापौरांनी आदेश दिले. रस्त्यांत अडथळे ठरणारे वृक्ष त्वरित हटविण्यात यावेत, तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्यात यावी, साफसफाई नियमित करावी, जुने ट्री गार्ड दुरुस्त करून नवीन ट्री गार्डसाठी प्रस्ताव तयार करावा, येत्या पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी आतापासून नियोजन करावे आदि सूचनाही महापौरांनी केल्या. इन्फो
खासगीकरणातून उद्याने विकसित करा : महापौरांची सूचना
By admin | Updated: March 29, 2017 21:59 IST