उमराणे : गेल्या दोन महिन्यांपूर्वी उमराणेसह परिसरातील जि.प. प्राथमिक शाळांतील पदविधर शिक्षकांच्या पदोन्नतीवर बदल्या झाल्याने रिक्त झालेल्या तीन शाळेतील तीन जागांवर नवीन शिक्षकांची नेमणूक झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शासनातर्फे आदिवासी भागात सेवा करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता दिला जातो. याच पार्श्वभूमीरवर पूर्वीच्या कळवण तालुक्यातील;परंतु सद्यस्थितीत देवळा तालुक्याच्या पश्चिम भागाचा या प्रोत्साहन भत्त्यासाठी समावेश आहे. त्यामुळे आदिवासी प्रोत्साहन भत्त्याचा लाभ उमराणे गावापासून अवघ्या ४ ते ५ कि.मी. अंतरावर असलेल्या दहिवड गावापर्यंत मिळतो. सन १९९९ मध्ये नाशिक जिल्ह्यात नवीन तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. त्यात देवळा तालुक्याचीही नवनिर्मिती करण्यात आल्याने पूर्वीच्या मालेगाव तालुक्यात असलेल्या उमराणे, सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव, वऱ्हाळे, खारीपाडा आदि आठ गावांचा समावेश देवळा तालुक्यात करण्यात आला. देवळा तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल १५ वर्षे उलटली असतानाही समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना शासकीय योजनांचा लाभ तर दूरच; परंतु पिढ्या घडविणाऱ्या शिक्षकांसाठी आदिवासी प्रोत्साहन भत्त्यासाठीही सामावून घेण्यात आले नाही. परिणामी एकाच तालुक्यात शिक्षण क्षेत्रातही पूर्वभाग व पश्चिम भाग असे दोन गट पडले असून, प्रोत्साहन भत्त्याच्या लालसेपोटी तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे उमराणेसह परिसरातील शाळेत रिक्त पदे असतानाही बहुतांशी शिक्षक या शाळांवर काम करण्यास नाखूश असतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार असल्याने परिसरातील प्राथमिक शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. संबंधित विभागाने त्वरित रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)
उमराणे परिसरातील शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची मागणी
By admin | Updated: September 28, 2014 22:46 IST