आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरु असून त्या केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. केंद्रापासून ३५ ते ४० कि. मी. अंतरावरुन शेतकऱ्यांना आपले धान्य विक्रीकरिता यावे लागते. याचा विचार होऊन
तालुक्यातील पेठ व कोहोर या ठिकाणी केंद्र निर्माण करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदिवासी विकास विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक धनराज महाले, भिका चौधरी, रामदास वाघेरे, अंबादास सातपुते आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, पेठ व कोहोर येथे खरेदी केंद्र सुरु करावे, किरकोळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच दिवशी धान्याची रक्कम अदा करावी, शासन अध्यादेशाप्रमाणे शेतकऱ्यांना धान्य विक्रीची रक्कम सात दिवसांत अदा करावी, खरीप पणन धान्य विक्रीची मर्यादा बारमाही सुरु करावी, धान्य विक्रीची हेक्टरी तालुकानिहाय मर्यादा शिथिल करावी, धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना घातलेली ७/१२ ची अट रद्द करावी, पेठ तालुक्यात भात, वरई, नागली ही पिके होत असल्याने वरई धान्य खरेदी करावी, धान्यासाठी लागणारे बारदान हे महामंडळाने उपलब्ध करावे, खरेदी केंद्रावर मूलभूत सुविधांसह पिण्याचे पाणी, मंडप, स्वच्छतागृह असावे, शेतकऱ्यांकडून व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावाने धान्य खरेदी करतात त्यांचेवर तत्काळ कारवाई करावी, आदी मागण्या केल्या आहेत.