लासलगाव : कांद्याचे निर्यातमूल्य कमी करून चारशे डॉलरपर्यंत झाले तरी पुरेसे कमी झाले नसल्याने ते दोनशे डॉलरपर्यंत कमी करण्याची मागणी होत आहे.वाढती महागाई आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करीत कष्टाने पिकविलेल्या लाल कांद्याचे भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. लाल कांदा साठवून ठेवता येत नसल्याने विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. गारपीट, पाणीटंचाई, विजेचे वाढते भारनियमन, खतांच्या व औषधांच्या वाढत्या किमती आणि बनावट बियाणे, औषधांचा सुळसुळाट, मजुरांची टंचाई यांसह असंख्य समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या आहेत. कांदा लागवडीसाठी येणारा खर्च विचारात घेतला तर एकीकडे बियाणे खरेदीपासून ते लागवड, खते, औषधे, निंदणी, काढणी, वाहतूक, लागवडीपूर्वीची मशागत असा खर्च सरासरी ८०ते८५ हजार रुपये येतो.या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची मेहनत (पिकांना पाणी देणे, फवारणी करणे, खते टाकणे, मशागत आदि) खर्च विचारात धरता एक एकरात साधारण १२० क्विंटल कांद्याचे उत्पादन गृहीत धरून आजच्या बाजारभावाची तुलना केल्यास ५० ते ६० हजार रुपयेहोतात. त्यात कांदा लिलावासाठीची वाहतूक आणि आडत, हमाली यांचा विचार केला तर झालेल्या खर्चाचा ताळमेळ होत नाही. कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेली मेहनत वाया जाताना दिसत आहे. असे असतानाही तालुक्यात उन्हाळ कांद्याची लागवड मात्र जोरात सुरू आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी लाल कांद्याची दोन हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली होती, तर उन्हाळ कांद्यासाठी ३२ हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आली आहे. लाल कांदा काढणीचा, तर उन्हाळ कांदा लागवडीचा हंगाम ऐन बहरात असून, तालुक्यातील शेतकऱ्यांचा दररोज सरासरी ७० हजार क्विंटल कांदा लिलावासाठी येत आहे. यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तशीच कांदा बाजारभावाची-देखील घसरण होताना दिसत आहे. यावर्षी निफाड तालुक्यात २६८ हेक्टर क्षेत्रावर लाल कांद्याची, तर दोन हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर पोळ कांद्याची लागवड झाली होती. हा कांदा आता मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे. लाल व रांगडा कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांदा लागवडीचे क्षेत्र मोठे असल्याने या कांद्याचेदेखील उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे किमान कांदामूल्याची अट हटविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
कांद्याचे किमान निर्यातमूल्य दोनशे डॉलर करण्याची मागणी
By admin | Updated: December 12, 2015 22:49 IST