खामखेडा : गेल्या एक-दीड महिन्यापासून कांद्याची खरेदी-विक्री व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.उन्हाळ कांद्याची सर्वाधिक लागवड राज्यात नाशिक जिल्ह्यात कसमादे परिसरात केली जाते. शेतकऱ्यांची वार्षिक आर्थिक उलाढाल या कांद्यावर अवलंबून असते. काही शेतकऱ्यांना विहिरीचे पाणी कमी झाल्याने लागवड केलेले काही क्षेत्र पाण्याअभावी सोडून द्यावे लागलेले होते. शासनाच्या निर्णयानुसार शेतमालाची अडत ही शेतकऱ्यांच्या मालाच्या पैशातून न कापता ती माल खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शेतकरीवर्गाकडून स्वागत करण्यात आले; मात्र व्यापाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात बेमुदत माल मार्केट बंद ठेवली होती. यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. यात व्यापारी व शासन अधिकारी यांच्यात चर्चा होऊन कांदा बाजारात ट्रॅक्टरच्या टॉलीत खुला न आणता तो गोणीत निवडून विक्रीसाठी आणावा, अशा अटींवर कांदा मार्केट चालू करण्यात आली. परंतु हा निर्णय शेतकरी हिताचा नसून शेतकऱ्यांच्या विरोधात घेतल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येऊन कांदा पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येऊ लागल्याने व व्यापारीही आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने पुन्हा कांदा मार्केट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यात शेतकरी, लोकप्रतिनिधींनी रस्ता रोखो, आंदोलने अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कांदा मार्केट सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.कांद्याच्या भरशावर लग्नाच्या बाजार, खरीप पिकाचे बी-बियाणे, कोबी, टामाटे, याचे बियाणे, यासाठी लागणारे औषधे आदि उधारीत कांदा विकून पैसे देतो. या अटीवर आणले आहे. खरिपाची पेरणी झाली. आता त्याला खते, औषधे दुकानदार उधारीत देत नाहीत. आता शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे त्याला कोणी उधारही देत नाही आणि उसनवारही देत नाही. त्यातल्या त्यात कांदा चाळीत खराब होऊ लागला आहे. काही चाळीत सडू लागला आहे. अजूनही मार्केट चालू होण्याचे चिन्ह दिसत नाही.आधीच शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून गारपीट, अवकाळी पाऊस, सतत होणारा वातावरणातील बदल याचा सामना करीत हाती उत्पादन न आल्याने कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे त्याने सोसायटी, बॅँक याचे कर्ज भरले नाही त्यामुळे थकबाकीदार असल्याने कर्ज देत नाही आणि दुकानदाराची उधारी थकल्याने तोही उधार देत नाही. त्यात चाळीत मोठ्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांद्याला भाव तर नाहीच; परंतु सतत बंद होणारे मार्केट, व्यापाऱ्यांचा बंद यामुळे वेळीच कांदा विकला न गेल्यामुळे मालात घट तर होणार आहे. त्यात मार्केट सुरू झाले तरी हमी भाव भेटेल यांची खात्री नाही. कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे तोही भरून निघतो की नाही याची खात्री नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकणार आहे. (वार्ताहर)
संकट : खते, औषधांसाठी पैसे नाही; बॅँका, सोसायट्यांत पत नाही
By admin | Updated: August 10, 2016 22:11 IST