नाशिक : गोदावरी नदीतील प्रदूषणाबाबत न्यायालयाने वारंवार फटकारे मारूनही झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिकेमुळे गोदावरीचा श्वास पाणवेलींनी गुदमरला असून, गोदावरीला पाणवेलीमुक्त करण्यासाठी आता नगरसेवक विक्रांत मते यांनी स्वत:हून पुढाकार घेत स्वखर्चाने आनंदवल्ली ते सावरकरनगर दरम्यान गोदापात्रात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या प्रदूषणासंबंधी साधू-महंतांसह पर्यावरणवादी सतर्क झाले असताना आणि न्यायालयाने वारंवार गोदाप्रदूषणाबाबत महापालिकेला फटकारले असतानाही गोदेच्या प्रदूषणात तसूभरही फरक पडलेला नाही. याउलट गोदावरीला पाणवेलींनी घट्ट विळखा मारला आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होण्याबरोबरच रहिवाशांना दुर्गंधीचाही सामना करावा लागतो आहे. महापालिकेने सदर पाणवेली काढण्याबाबत पुढाकार घेणे अपेक्षित असताना स्थानिक नगरसेवकाला अखेर व्यथित होऊन स्वखर्चाने गोदावरीला पाणवेलीमुक्त करण्यासाठी पुढे सरसावे लागले आहे. पाण्यावरील घंटागाडीच्या माध्यमातून गोदावरीचे प्रदूषण थांबविण्याची संकल्पना राबविणारे नगरसेवक विक्रांत मते यांनी आनंदवल्ली ते सावरकरनगर यादरम्यान गोदापात्रात असलेली पाणवेली हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत दक्षता अभियानचे सदस्य तसेच बोटक्लबचे खेळाडू दोन बोटींसह सहभागी झाले आहेत. मते यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला त्यावेळी शशिकांत टर्ले, अंबादास तांबे, अनिल काकड, संजय बोडके, गौरव घोलप, कैलास कडलग, सुमंत खांदवे, बापू मानकर, मिलिंद कदम, अजिंक्य घुले, सुनील खालकर, प्रताप देशमुख, प्रा. सोपान एरंडे, रमेश मते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पाणवेलीमुक्त गोदावरीसाठी नगरसेवकाचा पुढाकार
By admin | Updated: January 19, 2015 00:26 IST