नाशिक : वर्षानुवर्षे ५ लाखांचा आरोग्य विमा काढणारा कैलास शेळके हा नागरिक त्या मेडिक्लेमच्या भरवशावर कॉर्पोरेट रुग्णालयात दाखल झाला. दहा दिवसांत त्याचे बिलदेखील सव्वाचार लाख रुपये झाले. त्यामुळे काहीच पैसे न भरता जायला मिळेल, या आशेवर तो त्याचे सामान पिशवीत भरत असतानाच मेडिक्लेम कंपनीने केवळ तीन लाख दहा हजार रुपयांचेच बिल मंजूर केल्याचे सांगितले. त्यामुळे वरील सुमारे एक लाख पंधरा हजार रुपये शेळके यांनाच खिशातून भरण्याची वेळ आली. कोरोनाच्या लाटेत अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
काही हॉस्पिटल्समधील उदाहरणांमध्ये तर भराव्या लागलेल्या रकमेचा आकडा यापेक्षाही अधिक होता. मात्र, नागरिक कोरोनाच्या भीतीच्या आणि संबंधित विमा कंपनीच्या दहशतीखाली आल्याने त्यावेळी याबाबत उघडपणे तक्रार करू शकले नाहीत. काही नागरिकांकडे तर दोन ते पाच लाखांपर्यंतचे मेडिक्लेम असूनही त्यांना किमान एक लाख रुपये ॲडव्हान्स भरण्यास सांगण्यात आले. नागरिकांनी अनेकदा सांगूनही संबंधित व्यवस्थापनांनी त्यांना ॲडव्हान्स रक्कम भरणे भाग पाडले.
विमा रकमेत कपात कारण...
१ - आरोग्य विमा तीन लाखांचा असताना आणि बिल अडीच लाखांचे आलेले असतानाही संबंधित विमा कंपनीने बिल केवळ पावणेदोन लाख रुपयांचे दिले. कंपनी कधीही पूर्ण रक्कम देत नाही. केवळ ७० ते ८० टक्केच बिल देते, असा दावा कंपनीच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला.
२ - आरोग्य विमा तब्बल पाच लाखांचा असताना आणि बिल चार लाखांपेक्षा कमी आले होते. तरीदेखील त्यावेळी कंपनीने तीन लाख रुपयेच दिल्याने बिलातील दर कंपनीच्या निर्धारित दरांपेक्षा अधिक असल्याचे तांत्रिक कारण कंपनीच्या प्रतिनिधींकडून पुढे करण्यात आले होते.
------------------
उदाहरणे
१ पंचवटीतील मनसुख पटेल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्यावर या कुटुंबाला मेडिक्लेम असूनदेखील त्यहून अधिक असा अडीच लाखांचा भुर्दंड सहन करावा लागला.
२ गंगापूर परिसरातील विशाल नागरे यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोना झाल्यानंतर मेडिक्लेम असूनही त्यांना सुमारे लाखांचा अतरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागला.
३ सातपूर परिसरातील रमेश बोथरा यांना स्वत:ला कोरोना झाल्यानंतर त्यांनादेखील मेडिक्लेम असूनही त्याव्यतिरिक्त तब्बल पावणेदोन रुपयांची जादा रक्कम भरावी लागली.
---------------------
डमी